आताच्या घडीला दैनंदिन मालिका म्हणजे कथानकात पाणी ओतण्याचे काम असे म्हटले जाते. कारण दोन ते तीन वर्षे मालिका टिकवून राहण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. खरं तर या मालिका दोन दिवस जरी पाहिल्या नाही तरी कथानक एकाच जागी अडकलेले तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आपला एक एपिसोड जरी मिस झाला तरीही त्यात काही फरक पडत नाही. पण काही अपवादात्मक मालिका होत्या ज्या रोज वेगवेगळ्या विषयाला अनुसरून त्याचे चित्रीकरण करत होते. केदार शिंदे दिग्दर्शित श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिकाही त्यातलीच एक म्हणावी लागेल.
मालिकेत दरवेळी वेगळा एक विषय हाताळला जायचा आणि तो एकाच एपिसोड पुरता मर्यादित असायचा. त्यामुळे आबा आज कुठला नवीन विषय घरून येणार याची उत्सुकता असायची. महत्वाचं म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका २००१ ते २००५ या कालावधीत प्रसारित होत होती. एवढे वर्षे तग धरूनही या मालिकेचे केवळ १६५ भागच दाखवण्यात आले होते. याचं कारण म्हणजे ही मालिका आठवड्यातून एकदाच दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता दाखवली जायची. मालिका निरोप घेतेय हे जेव्हा प्रेक्षकांना कळले तेव्हा नाराजी दर्शवली होती. काही महिन्यांपूर्वी श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील कलाकारांचे रियुनियन पाहायला मिळाले. यावेळी राजन भिसे, केदार शिंदे, शुभांगी गोखले, दिलीप प्रभावळकर, रेश्मा नाईक यांनी हजेरी लावली. यावेळी विकास कदम मात्र काही कारणास्तव येऊ शकला नव्हता.
तेव्हा शिऱ्याला सगळ्यांनी मिस केले. या कलाकारांनी मालिकेच्या काही गमतीजमती शेअर केल्या होत्या. त्यातला एका एपिसोडचा किस्सा हृदयस्पर्शी होता. दिलीप प्रभावळकर यांनी या मालिकेचे बरेचसे कथानक लिहिले होते. तर कलाकार स्वतःच नवनवीन विषय सुचवायचे. एका एपिसोडमध्ये श्यामला आबांच्या खोलीत एसी बसवायचा हट्ट करते. संध्याकाळी शेखर ऑफिसवरून घरी येतो तेव्हा श्यामला हा विषय पुन्हा काढते. एसी बसवायचा म्हणून तुम्ही पैसे आणले की नाही? असा प्रश्न करताच शेखर म्हणतो की, हे बघ श्यामला एसी लागेल, कुठल्या खोलीत लागेल काही माहिती नाही. पण त्या खोलीचं दार बंद होईल हे तू लक्षात ठेव. एक दार बंद होईल हे चालणार आहे का तुला? असा प्रश्न विचारताच श्यामला ‘नको तो एसी’ म्हणत तो विषय तिथेच थांबवते. हे वाक्य राजन भिसे यांनी स्वतः लिहिलं होतं. ही आठवण सांगताना देखील शुभांगी गोखले भावुक झाल्या होत्या.