झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. लवकरच त्यांच्या लग्नाचा शाही थाट मालिकेतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचे लग्न ज्या ठिकाणी होत आहे ते ठिकाण खूपच खास आहे. कारण हे ठिकाण आहे दिवंगत आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांचे एनडी स्टुडिओ. तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कोल्हापूरी बाज असणारी मालिका आहे. त्यामुळे या मालिकेचे शूटिंग कोल्हापूर येथेच पार पडत होते.

अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाचा थाट दाखवण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांनी एनडी स्टुडिओला पसंती दिली आहे. त्यामुळे मालिकेची ही संपूर्ण टीम गेल्या काही दिवसांपासून एनडी स्टुडिओतच ठाण मांडून होती. नितीन देसाई यांच्या कर्जत मधील एनडी स्टुडिओमध्ये रॉयल पॅलेसचा हा सेट मोठ्या दिमाखात उभा आहे. अधिपती आणि अक्षराच्या लग्नासाठी मालिकेच्या टीमने या रॉयल पॅलेसची निवड केली. ऋषीकेश शेलार, कविता लाड तसेच शिवानी रांगोळे हे सर्वजण शूटिंग करण्यासाठी एनडी स्टुडिओमध्ये दाखल झाले. तेव्हा तिथला परिसर पाहून सगळ्यांचा शीण एका क्षणात नाहीसा झाला. ऋषीकेश या सेटवर येताच खूप उत्साही झाला होता. हा पॅलेस एका राजवाड्यापेक्षा कमी नाही असे तो नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

ऋषीकेश एनडी स्टुडिओबद्दल सांगतो की, आम्ही इथे पोहोचलो तेव्हा सगळे प्रवासाने दमून गेले होते. पण इथे आल्यानंतर सगळ्यांची मरगळ काही क्षणात गायब झाली. इथला परिसर पाहून सगळ्यांचा उत्साह वाढला. हीच या जागेची ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तुम्हाला मालिकेतून देखील अनुभवायला मिळेल. तर शिवाणीने देखील एनडी स्टुडिओच्या रॉयल पॅलेसच्या भव्यदिव्यतेचे मोठे कौतुक केले. भुवनेश्वरी यांच्या म्हणण्यानुसार हे लग्न ग्रँड होणार आहे त्याचा भव्यदिव्यपणा या स्टुडिओत जाणवतो. आपण ज्या ठिकाणी शूटिंग करतो तिथल्या वातावरणावर बरंच काही अवलंबून असतं. लग्नाच्या निमित्ताने इथला सेट खूप छान सजवण्यात आला आहे, असे शिवानी रांगोळे म्हणते.