तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील अक्षराच्या भूमिकेमुळे शिवानी रांगोळे चांगलीच प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. या भूमिकेमुळे शिवानीला प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले. शिक्षणाचा हट्ट धरणारी अक्षरा भुवनेश्वरीला कसे आपलेसे करते याची कहाणी मालिकेत रंजक झाली आहे. नुकतेच या मालिके निमित्त शिवानी रांगोळे हिने एक मुलाखत दिली त्यात तिने फटाके उडवत नसल्याचे म्हटले आहे. लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे शिवानीने फटाके फोडण्याचे सोडून दिले होते.
हा किस्सा सांगताना शिवानी म्हणते की, मला फटाके उडवायला नाही आवडत. लहानपणीच फटाके फोडण्याचे सोडून दिले होते. कारण मला प्राण्यांची खूप आवड आहे. माझ्या घराच्या समोरच एक चिमणीचं घरटं होतं. हे खुप फिल्मी वाटेल ऐकायला पण हे घडलंय माझ्याबरोबर. आम्ही पाचव्या मजल्यावर राहत होतो. दिवाळीत त्या घरट्याला एक बाण लागला आणि त्यात ते घरटं पूर्णपणे जळून गेलं. त्यावेळी त्या घरट्यात कोणीच नव्हतं.पण त्यानंतर त्या चिमणीने पुन्हा ते घरटं बांधण्यासाठी जी धडपड केली होती ती मी जवळून पाहिली होती. आताही माझ्याकडे एक बोका आहे. त्याला फटाक्यांच्या आवाजाचा खूप त्रास होतो. मला वाटत नाही की फटाके उडवूनच आनंद साजरा करता येतो, त्यामुळे मी फटाके उडवत नाही.
मी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनाही सांगते की, प्लिज फटाके उडवू नका. असे ती तिच्या चाहत्यांना याबाबत नेहमीच आवाहन करत असते. शिवानी सध्या मालिकेनिमित्त शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण तिला दिवाळीत चकली बनवायला खूप आवडते. चकली बनवताना आईचे मार्गदर्शन असले की ती उत्तम बनते असेही म्हणते. त्यांच्या मालिकेचा सेटही आता एका कुटुंबासारखाच आहे. त्यामुळे दिवाळी इथे साजरी केली किंवा घरी साजरी केली तरी एकच आहे इतका छान बॉंडिंग या कलाकारांसोबत तिचा झाला आहे. मालिकेनिमित्त घराबाहेर असणाऱ्या sशिवानीने लवकरात लवकर घरी यावे आणि तिचे कौतुक करावे असेही सासू मृणाल कुलकर्णी यांचे म्हणणे असते.