कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा चौथा सिजन प्रसारित करण्यात आल्यापासून टीआरपी थोड्या प्रमाणात वाढला आहे. वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, जीव माझा गुंतला मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. कलर्सवर चक्क श्वेता शिंदेच्या मालिकेची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. देवमाणूस, अप्पी आमची कलेक्टर, मिसेस मुख्यमंत्री, लागीरं झालं जी या श्वेता शिंदेच्या काही गाजलेल्या मालिका. झी मराठी आणि श्वेता शिंदे हिचं एक अतूट नातं तयार झालं आहे. आता कलर्स मराठीकडे तिने आपली पाऊले वळवली आहेत.

तरुण, होतकरू शेतकऱ्याच्या भावनिक विषयाला हात घालून ‘शेतकरीच नवरा हवा’ ही नव्या दमाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. येत्या १४ नोव्हेंबर २०२२ पासून संध्याकाळी ६.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांनी या मालिकेचे स्वागत केलेले दिसून येते. शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या या मालिकेत सायजीच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता प्रदीप घुले झळकणार आहे. त्याला साथ देत आहे अभिनेत्री ऋचा गायकवाड. सोबत नीता टिपणीस, सुरेखा कुडची, कल्पना सारंग, रोहित भोसले, स्वाती भिंगारदिवे, सायली शिर्के ही कलाकार मंडळी महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

प्रदीप घुले आणि ऋचा गायकवाड प्रथमच या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रदीपने घेतला वसा टाकू नको, क्राईम पेट्रोल, स्वराज्यरक्षक संभाजी, लक्ष्मी नारायण अशा लोकप्रिय मालिकांमधून लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. लालबत्ती या चित्रपटातही तो एका महत्वाच्या भूमिकेत दिसला आहे. ऋचा गायकवाड ही मॉडेल आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ऋचाला मॉडेलिंगचे वेध लागले होते. श्रावण क्वीन २०२२ सौंदर्य स्पर्धेत ऋचा विजेती ठरली आहे. श्रावण क्वीन स्पर्धेत विजेत्या मॉडेल्सना अभिनयाची संधी दिली जाते. वेगवेगळ्या मालिकांमधून या सौंदर्यवती अभिनेत्री बनून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत; त्यात आता ऋचाचे देखील नाव घ्यावे लागेल.
श्वेता शिंदे हिने ऋचाला आपल्या आगामी मालिकेतून ही संधी मिळवून दिली आहे. पहिलीच मालिका आणि प्रमुख भूमिका यामुळे ऋचा खूपच उत्सुक असल्याचे सांगते. १४ नोव्हेंबर पासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, मात्र काही प्रेक्षकांनी या मालिकेच्या वेळेवर नाराजी दर्शवली आहे. संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होणारी राजा राणीची गं जोडी ही मालिका निरोप घेणार की काय? अशी शंका देखील उपस्थित होत आहे. ह्या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे मालिका संपवू नये अशी मागणी चाहत्यांनी केली आहे. तूर्तास श्वेता शिंदे हिने एका वेगळ्या विषयाला हात घालून; ग्रामीण बाज असलेली मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आणल्याने तिचे कौतुक केले जात आहे.