माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने झी वाहिनीचा घटलेला टीआरपी वाढवण्यास नक्कीच मदत केली आहे. कारण एवढ्या कमी कालावधीत मालिकेचा प्रचंड चाहतावर्ग निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे अर्थात या मालिकेच्या कथानकाचा आणि त्यातील कलाकारांचा या यशामागे मोठा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही. मालिकेत शेफालीचे पात्र देखील भन्नाट दर्शवलेले पाहायला मिळते. थोडीशी अल्लड असलेली ही शेफाली ५०० करोडचा मालक असलेल्या मुलाशीच लग्न करणार म्हणते त्यामुळे समीर हा बॉस असल्याचे समजून ती त्याला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. यात समीर आणि शेफालीमध्ये घडणाऱ्या गमतीजमती मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
शेफालीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “काजल काटे” हिने. काजल काटे ही मूळची नागपूरची. कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने अभिनय साकारला होता. त्यांच्या नाटकाच्या ग्रुपने नाट्यपथकं आयोजित केली होती त्यात काजल उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायची. झी युवा वरील ‘डॉक्टर डॉन’, सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून तिने छोट्या मोठया भूमिका साकारल्या होत्या. २०१९ साली काजल काटे ही प्रतीक कदम सोबत विवाहबद्ध झाली. तुझं माझं ब्रेकअप या मालिकेनंतर काजलला पुन्हा एकदा झी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून अभिनयाची संधी मिळाली.
काजल काटे हिची थोरली बहीण “स्नेहा काटे शेलार” ही देखील मराठी हिंदी मालिका अभिनेत्री आहे. अँड टीव्ही वरील ‘डॉ बी आर आंबेडकर’ या हिंदी मालिकेत स्नेहा काटे शेलार हिने जिजाबाईची भूमिका साकारली आहे. रामजीची दुसरी पत्नी जिजाबाई हे पात्र स्नेहाला साकारण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेव्यतिरिक्त स्नेहा मराठी मालिकांमधून महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. स्वराज्यजननी जिजाबाई, प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, गर्ल्स हॉस्टेल, दुनियादारी फिल्मी इश्टाईल अशा अनेक मालिका, नाटकांमधून तिने अभिनय साकारला होता. स्नेहा काटे हिचा नवरा “ऋषिकेश शेलार” हा देखील मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तो दौलत चे पात्र साकारत आहे. ऋषिकेशने सावित्रीजोती, स्वराज्यजननी जिजामाता, छत्रीवाली, शांतेचं कार्ट चालू आहे, लक्ष्मी सदैव मंगलम या गाजलेल्या मालिका आणि नाटकातून अभिनय साकारला आहे. याशिवाय डॉ तात्या लहाणे, जिंदगी विराट, पॅरिस या चित्रपटातून त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती.
माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतून काजल काटे हिने साकारलेली शेफालीची भूमिका नक्कीच प्रभावी ठरेल हे वेगळे सांगायला नको. पुढे जाऊन समीर आणि शेफाली यांच्यात प्रेम जुळेल की नाही हे पाहायला प्रेक्षकांना निश्चितच आवडेल तुर्तास शेफालीचे पात्र आपल्या अभिनयाने रंगवणाऱ्या अभिनेत्री काजल काटे हिचे अभिनंदन …