अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेत अक्षयची भूमिका साकारत आहे. रमा आणि अक्षयच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्याचमुळे ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत १४ व्या क्रमांकावर टिकून आहे. शशांक केतकर याने झी मराठीवरील होणार सून मी ह्या घरची मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर शशांक अनेक दर्जेदार भूमिका साकारताना पाहायला मिळाला. अभिनयाच्या प्रवासातला त्याचा आलेख चढताच राहिला आहे. अशातच सामाजिक भान जपत तो आपल्या आसपास घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर देखील प्रकाश टाकताना दिसतो.
बसमध्ये महिलांच्या राखीव सीटवर पुरुष मंडळी बसतात तेव्हा त्याला ही गोष्ट खटकली होती. तसेच एटीएममध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या स्लिप पाहून तो खूपच भडकला होता. अशा कारणामुळे शशांक नेहमीच चर्चेत राहिला आहे. मात्र आता लवकरच येणाऱ्या होळीच्या सणाबद्दलही त्याने एक महत्वाचा खुलासा केलेला आहे. होळीला अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत असतात. होळी नंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरी केली जाते. त्यानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र शुभेच्छा देत असताना सगळे जण मराठी सणांमध्ये गोंधळ घालतात. होळी, धुलिवंदन, रंगपंचमी हे तिन्ही सण वेगवेगळे आहेत. तीनही दिवसांसाठी अनेकजण होळीच्या शुभेच्छा असे सरसकट मेसेजेस पाठवत असतात. मात्र हे तिन्ही हिंदू सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात हे शशांकने अधोरेखित करताना म्हटले आहे.
कलाकार मंडळी असो किंवा लेखक, दिग्दर्शक सर्वच जण सणांच्या शुभेच्छा देताना गोंधळ घालतात आणि सरसकट होळीच्या शुभेच्छा देऊन मोकळे होतात. पण आम्ही मराठी परंपरा जपतो असे म्हणणाऱ्यांनी तिन्हींमधला फरक समजून घेणे गरजेचे आहे. असे म्हणत शशांकने अशा लोकांची कानउघडणी करणारी पोस्ट लिहिली आहे. शशांकचे म्हणणे अनेकांना पटले असून त्याच्या पोस्टवर भरभरून लिहिले जात आहे. आपल्याकडे धुलिवंदन साजरी केली जाते, पण आता रंगपंचमीला सगळ्यांमध्ये जास्त उत्साह संचारलेला पाहायला मिळतो. होळीच्या दिवशीच बॉलिवूड सेलिब्रिटी रंगांची उधळण करतात. मात्र आपल्याकडे अशी पद्धत नाही, असेही अनेकांनी अधोरेखित केलेले पाहायला मिळत आहे. या सर्वांना शाशंक सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत असून, अनेकांच्या शंकांचे निरसन सुद्धा करत आहे.