एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून असली की त्या मालिकेतील पात्र बदलणे खूप कठीण जात असते. हे आव्हान पेलले होते पिंकीचा विजय असो या मालिकेने. खरं तर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी शरयू सोनवणे हिने काही दिवसांपूर्वीच मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने साकारलेली अल्लड, नटखट पिंकी प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे ती मालिका सोडतीये हे कळताच प्रेक्षकांनी तिच्या निर्णयावर नाराजी दर्शवली होती. शरयू नंतर ही भूमिका आरती मोरे नीभावताना दिसत आहे. मात्र प्रेक्षक तिला या भूमिकेत लवकर स्वीकारू शकले नव्हते.
शरयुने ही मालिका सोडल्यानंतर ती कुठल्या नव्या प्रोजेक्टमध्ये तर दिसणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता शरयू सोनवणे लवकरच घरसंसारची जबाबदारी सांभाळणार असल्याचे चित्र समोर आले आहे. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शरयुने जयंत लाडे सोबत साखरपुडा केला आहे. आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला मी त्रास देण्याचं ठरवलं आहे, असे म्हणत साखरपुड्याचे काही खास फोटो शरयुने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिच्या या आयुष्याच्या नवीन प्रवासाबद्दल चाहत्यांनी आणि मराठी सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. शरयूने ज्याच्याशी साखरपुडा केला तो जयंत लाडे चित्रपट निर्माता आहे. सूरसपाटा तसेच अ पेइंग घोस्ट सारख्या मराठी चित्रपटांचे त्यांनी निर्माता म्हणून काम केले आहे.
जयंत लाडे गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीशी जोडलेला आहे. तर शरयू सोनवणे हिने देखील अभिनय तसेच नृत्य क्षेत्रात यश संपादन केले आहे. प्रेम पॉइजन आणि पंगा या मालिकेनंतर शरयू सोनवणे पिंकीचा विजय असो या मालिकेतून पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारताना दिसली. शरयुने साकारलेली पिंकी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अल्लड पिंकी शरयुने तिच्या उत्तम अभिनयाने चांगलीच वठवली होती, त्यामुळे तिच्या एक्झिटवर प्रेक्षक नाराज झाले होते. मात्र आता शरयू जयंत लाडे सोबत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. साखरपुड्यानंतर आता ते दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.