कुठल्याही कार्याची सुरुवात बाप्पाच्या नावाने केली जाते. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलेले पाहायला मिळाले. ही अभिनेत्री आहे रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुल. अनघा अतुल ही प्रसिद्ध ज्योतिषी अतुल भगरे यांची मुलगी आहे. भगरे गुरुजी या नावाने त्यांची स्वतःची ओळख आहे. झी मराठीच्या घेतला वसा टाकू नको या मालिकेत ते दिसले होते याशिवाय झी मराठीच्याच वेध भविष्याचा मध्ये त्यांनी महत्वपूर्ण सहभाग दर्शवला होते.
अतुल भगरे यांची मुलगी अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांच्या निर्मिती संस्थेत मॅनेजर म्हणून काम केले होते. अनघाला अभिनयाची आवड असल्याने तिने मालिका चित्रपटासाठी ऑडिशन देणे सुरू ठेवले. अनन्या नाटकात तिने मैत्रिणीची भूमिका साकारली होती. क्यूँ रिषतों में कट्टीबट्टी अशा हिंदी मालिकेत सुद्धा तिला अभिनयाची संधी मिळाली. रंग माझा वेगळा या मालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. खरं तर तिची ही भूमिका विरोधी होती पण मालिकेत तीन वर्षाहून अधिक काळ असल्याने तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला आणि यातूनच अनघाचा अभिनय प्रेक्षकांनाही आवडला. या मालिकेनंतर काय? असे तिला विचारण्यात येऊ लागले. तेव्हा अनघाने हॉटेल व्यवसायात पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे.
पुण्यातील डेक्कन परिसरात वदनी कवळ या नावाने अनघाने परिपूर्ण थाळी मिळणारे हॉटेल सुरू केले आहे. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिने या हॉटेलच्या कामाला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात हॉटेलचे काम पूर्ण होईल तेव्हा ते खवय्यांसाठी सज्ज झालेले पाहायला मिळेल असे तिने म्हटले आहे. याबाबत अनघा म्हणते की, वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए, आता पुढे काय?
तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलय. मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. In the heart of Pune, Deccan. लवकरच येतय तुमच्या भेटीला. खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. गणपती बाप्पा मोरया.