सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरीने सौंदर्य स्पर्धा जिंकली असून ती मिसेस कोल्हापूरची मानकरी ठरली आहे. तर शालिनीला गौरीपुढे हार पत्करावी लागली असल्याने ती आता कुठले कारस्थान रचणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. मालिकेतली शालिनी नेहमीच साध्या भोळ्या गौरीला अडचणीत टाकत असते, तिला त्रास देत असते… शालिनीचे हे विरोधी पात्र साकारले आहे अभिनेत्री “माधवी निमकर कुलकर्णी” हिने. माधवि निमकर ही मराठी सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण आहे. आज माधवीबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
माधवी निमकर ही मूळची खोपोलीची. १७ मे १९८४ रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली येथे तिचा जन्म झाला. माधवीची आई गृहिणी तर तिचे वडील कलाकार आहेत. खोपोली येथील स्थानिक शाळेत शिक्षण घेतलेल्या माधवीचे मराठी सृष्टीत आगमन झाले ते तिच्या बहिणीमुळे. माधवीची मावस बहीण ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “सोनाली खरे” आहे. सोनाली खरेच्या पुढाकाराने माधवीचे मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले होते हे माधवी मीडियाशी बोलताना म्हणाली होती. सुरुवातीला खोपोलित कॉलेजमध्ये असताना फॅशन कशी असते याची कल्पना देखील त्यावेळी ध्यानी मनी नव्हती मात्र त्यानंतर फॅशन सेन्स कसा असतो हे मी सोनाली कडे पाहून शिकले, तिच्याच मार्गदर्शनाने मी अभिनय क्षेत्रात आले असे माधवी म्हणते.
माधवी ने २००९ सालच्या “बायकोच्या नकळत” हा पहिला मराठी चित्रपट अभिनित केला. त्यानंतर असा मी तसा मी, सगळं करून भागलं, धावा धाव , संघर्ष अशा मराठी चित्रपटातून ती महत्वाच्या भूमिकेत झळकली. स्वप्नांच्या पलीकडले, हम तो तेरे आशिक है, द रायकर केस या मालिकेतूही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. चित्रपट आणि मालिकेमधून माधवीच्या वाट्याला बहुतेकदा विरोधी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळतात. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून माधवी शालिनीच्या भूमिकेत दिसत आहे. शालिनीच्या कुरघोड्याचा प्रेक्षकांना राग येतो हीच तिच्या अभिनयाची पावती म्हणावी लागेल. एका कार्यक्रमात गेली असताना माधविला दोन बायकांनी पाठीत बुक्क्या मारल्या होत्या ही आठवणही तिने सांगितली होती. विक्रांत कुलकर्णी हे माधवीच्या नवऱ्याचे नाव आहे. तर रूबेन कुलकर्णी हा तिचा एकुलता एक मुलगा आहे.