महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधुन कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम केलेलं आहे. फिल्टर पाड्याचा बच्चन, विक्रोळीचा शाहरुख, कोहिनुर हिरा ओंकार भोजने अशी विशिष्ट नावाने गाजलेली कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अर्थातच यामागे त्या कलाकारांची मोठी मेहनत आहे हे विसरून चालणार नाही. आपल्याला शाहरुख खान बनायचंय असं स्वप्न पाहणाऱ्या पृथ्वीक प्रतापने देखील याच कारणासाठी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. पण शाहरुख खान बनायचंय हे जरी स्वप्न असलं तरी मात्र शाहरुख बनणं कदापि शक्य नाही हे कळून चुकलं होतं. त्यासाठी तुम्हाला आधी चांगला अभिनेता व्हावं लागेल याची जाणीव त्याला वेळोवेळी करून देण्यात आली.
नुकतीच पृथ्वीक प्रतापने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पृथ्वीकने त्यांच्या आडनाव बदलण्याचा किस्सा इथे सांगितला आहे. पृथ्वीक खूप लहान होता त्याचवेळी त्याच्या बाबांचे निधन झाले होते. साधारण ३० व्या वर्षी त्याच्या बाबांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे त्यांना जे नाव कमावता आलं नाही ते मला मिळवायचं होतं असं पृथ्वीकने ठरवून ठेवलं होतं. आपल्याला शाहरुख खान बनायचंय म्हणून पृथ्वीक या इंडस्ट्रीत दाखल झाला खरा. पण त्याअगोदर आपल्याला उत्तम अभिनेता बनायचंय याची त्याला जाणीव करून देण्यात आली. त्यादृष्टीने पृथ्वीकने एकेक पाऊल पुढे टाकत स्ट्रगल करत मालिका, चित्रपट, विनोदी कार्यक्रमातून काम करण्यास सुरुवात केली. सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांनी पृथ्वीकला मोठा ब्रेक मिळवून दिला.
माझी स्ट्रगल स्टीरी रेडी होती फक्त मला तशी प्रसिद्धी मिळत नव्हती, असे पृथ्वीक या मुलाखतीत म्हणतो. पुढे तो म्हणतो की, मी विनोदवीर मुळीच नाही, मी अभिनेता आहे. विनोद करून तुम्हाला हसवण्याचे काम करतो. कांबळे हे पृथ्वीकचं आडनाव, तू कांबळे आडनाव का काढलंस? या प्रश्नाचे उत्तर देताना पृथ्वीक म्हणतो की, आपल्या प्रत्येकाला एका साच्यात ठेवलं जातं. मला वाटत नाही सगळ्यांनी हे साचेबद्ध जीवन झिडकारून मोकळं व्हावं. पण जेव्हा एखादा कुलकर्णी असतो त्याला ब्राह्मण म्हटलं जातं, शिंदे आहे तर ओबीसी. कांबळे म्हंटलं की दलित, पाटील असला की मराठा म्हणतात. पण मुळात फक्त तुमच्या नावावरून का तुम्ही ओळखले जात नाहीत. आडनावावरून तुम्हाला महान ठरवलं जातं याची मला चीड आहे.
माझ्या जवळच्या लोकांना तसं केलं याचा मला खूप त्रास झाला. लोकांना त्यांच्या आडनावावरून एक ग्रुप बनवला होता. देशात आडनावा वरूनच लोकं अडकून पडतात. मी आणि माझ्यासारखे अजून दहा जण आडनाव काढून फिरत असतील. एक माणूस म्हणून समाजात तर लोकं आपोआप तुमच्याकडे माणूस म्हणून बघायला लागतात. मला अनेकदा माझं पृथ्वीक प्रताप म्हणजे कुठला तू असं विचारलं जातं तेव्हा मी राजस्थानचा आहे असं म्हणतो. यातूनच लोकं तुमच्या जातीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मला माझ्या जातीबद्दल अजिबात न्यूनगंड नाही, माझं आडनाव कुलकर्णी जरी असतं तरी मी आडनाव लावलं नसतं.