गेल्या काही वर्षांपासून मराठी कलाकारांना राजकारणाचे वेध लागले आहेत. बहुतेक मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन कलाकारांच्या बाजू मांडण्याचा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरेखा कुडची, सुरेखा पुणेकर, प्रिया बेर्डे, सविता मालपेकर या मराठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आसावरी जोशी या मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत गेल्या तीन ते चार दशकांपासून सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचे अचानकपणे राजकारणात प्रवेश करणे प्रेक्षकांना आश्चर्यकारक करणारे ठरले आहे.
१९८६ साली माझं घर माझा संसार या मराठी चित्रपटातून त्या झळकल्या होत्या. एक रात्र मंतरलेली, गोडी गुलाबी, सुखी संसाराची १२ सूत्रे, लढाई, तांदळा, मुंबई पुणे मुंबई २, डबल सीट या मराठी चित्रपटासोबतच वक्त, प्यार जिंदगी है, ओम शांती ओम, हॅलो डार्लिंग अशा हिंदी चित्रपटात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. आसावरी जोशी यांनी आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात. सोज्वळ आणि सालस भूमिकांसोबतच त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. जबान संभाल के, फॅमिली नं १, ऑफिस ऑफिस, नया ऑफिस ऑफिस, शेक इट अप या मालिकांमधून आसावरी जोशी यांनी हिंदी सृष्टीत विनोदी अभिनयाची छाप सोडली.
हिंदी मालिका सृष्टीत रमल्यानंतर आसावरी यांनी बऱ्याच कालावधीनंतर मराठी सृष्टीत पुनःपदार्पण केले. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत त्यांनी आदिती सूर्यवंशी हे पात्र साकारले. काही महिन्यांपूर्वी आसावरी यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते मात्र या गोष्टीला विलंब लागला होता. राजकारणात प्रवेश करताच आसावरी यांनी याबाबत म्हटले की, ‘कलाकारांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी नक्की पूर्ण करेन, मी राजकारणात जरी आले असले तरी कुठलेही राजकारण न करता कामं करेन. राष्ट्रवादी पक्ष हा संवेदनशीलपणे लोककलाकार आणि कलाकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच मी हा पर्याय निवडला आहे.’