१३ सप्टेंबर रोजी मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हिंदी मराठी सृष्टीत उषा नाडकर्णी यांनी खाष्ट सासूच्या भूमिका उत्तम निभावलेल्या पाहायला मिळाल्या. आपल्या रोखठोक, स्पष्ट बोलण्यामुळेही त्या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. उषा नाडकर्णी यांचे बालपण मुंबईतच गेले. सेवासदन ही त्यांची शाळा. शाळेत अतिशय मस्तीखोर विद्यार्थिनी म्हणून त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या आई शिक्षिका असल्याने शिस्तप्रिय होत्या. मात्र वडिलांकडून त्यांनी खूप मार खाल्ला होता, त्यामुळे मी आजही मस्तीखोर आहे. मला एका जागेवर गप्प बसून राहायला बिलकुल आवडत नाही असे उषा नाडकर्णी म्हणतात.
लहानपणापासूनच अभिनयाची त्यांना आवड होती पुढे बँकेतील नोकरी सांभाळून नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. घर संसार, नोकरी आणि अभिनय ही तारेवरची कसरत करत त्यांनी चंदेरी दुनियेत स्वतःची ओळख बनवली. मराठी बिग बॉसच्या घरातील त्यांचा दरारा दिसून आला. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून उषा नाडकर्णी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. टराटराss नी फराफराss सारखे त्यांचे डायलॉग चांगलेच प्रचलित आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी खाष्ट सासूची भूमिका गाजवली होती. नुकतेच बस बाई बसच्या मंचावर त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी या मालिकेचा एक किस्सा त्यांनी सांगितला.
या मालिकेत काम करत असताना एक सिन देण्यास चक्क नकार दिला होता. रात्री दीड दोन वाजता हा सिन शूट होत होता. या सीनमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले होते. दिग्दर्शकाने त्यांना अस्थीकलश धरायला लावले. त्यावेळी उषा नाडकर्णी यांनी तो अस्थीकलश हातात घ्यायला नकार दिला. ‘जिच्या मुलाचे निधन झाले, त्याच्या अस्थी त्याची आई उचलणार? असं कोण करतं? आमच्यात असं करत नाही. मी हा सिन करणार नाही’. असे म्हणून त्या खुर्चीत बसून राहिल्या. त्यानंतर दिग्दर्शक आणि टीममध्ये चर्चा सुरू झाली. उषा नाडकर्णी यांचे म्हणणे त्यांना योग्य असल्याचे वाटले आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली. ‘हे दिग्दर्शक काहीही करायला सांगतात. बेअक्कल असल्यासारखे करतात, मुलाचे अस्थीकलश आई धरते, एकतर पूर्ण माहिती असावं नाहीतर अडाणी, हे मधलं नको’.