ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे काल सोमवारी २६ डिसेंबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. राजा बापट हे ८५ वर्षांचे होते मात्र या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. सोशल मीडियावर सक्रिय असणे, कलाकारांशी संवाद साधणे हे त्यांचे नित्याचे काम होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. राजा बापट यांच्या मागे त्यांची पत्नी सुषमा बापट, मुलगी शिल्पा म्हसकर आणि जावई गिरीश म्हसकर, नातवंडे असा परिवार आहे. काल दुपारी शिवाजी पार्क येथील विद्युत दाहिणीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
राजा बापट यांचे चंद्रकांत बापट हे मूळ नाव, त्यांनी बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. रत्नाकर मतकरी यांच्या अनेक नाटकांमधून ते महत्वाच्या भूमिकेत दिसले. रंगायन या नाट्यसंस्थेशी ते जोडले गेले होते. जन्म दाता, शांतता कोर्ट चालू आहे, यशोदा, हमीदाबाईची कोठी, पप्पा सांगा कुणाचे अशा दर्जेदार नाटकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. राजा बापट यांनी नाटक, चित्रपट तसेच मालिका सृष्टीत तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत देखील चौफेर मुशाफिरी केली होती. शराबी, आम्रपाली, बाळा गाऊ कशी अंगाई, थोरली जाऊ, एकटी, जावई विकत घेणे आहे. अशा चित्रपटांमधून तसेच वादळ वाट, दामिनी, या गोजिरवाण्या घरात, मनस्विनी, अग्निहोत्र, श्रावणबाळ रॉकस्टार अशा मालिकांमधून ते झळकले आहेत.
व्हेंटिलेटर या चित्रपटात देखील ते महत्वाच्या भूमिकेत होते. यात ते झोपुन असल्याचे दाखवण्यात आले, त्यामुळे कोणाला वाईट वाटू नये म्हणून ही गोष्ट त्यांनी स्वकीयांपासून लपवून ठेवली होती. राजा बापट हे माहिम मध्ये वास्तव्यास होते. चिकित्सक समूह शिरोळकर शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले होते. पुढे अभिनयाचे बारकावे शिकता यावे म्हणून त्यांनी सिध्दार्थ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. या दरम्यान पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी युनियन बँकेत नोकरी देखील केली होती. नवख्या कलाकारांचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यामुळे त्यांनी आपलेपणा जपला होता. वयाच्या ८५ व्या वर्षातही ते उत्स्फूर्तपणे काम करत राहिले. म्हणूनच राजा बापट यांचे जाणे मनाला चटका लावून गेले अशी खंत मराठी सेलिब्रिटींनी व्यक्त केली आहे.