एकेकाळी चित्रपट गृहात बॉलिवूड चित्रपटांची चलती असायची त्याकाळातही दादा कोंडके यांनी आपले चित्रपट सुपर डुपर हिट केलेले होते. अगदी तसेच चित्र सध्या चित्रपट गृहात पाहायला मिळत आहे. कारण झिम्मा, पांडू आणि जयंती यासारख्या चित्रपटांनी हाऊसफुल्लचे बोर्ड लावत तिकीट बारीवर मोठा गल्ला जमा केला आहे. एक दोन आठवडे नव्हे तर तब्बल चारही आठवडे हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल केले आहेत. यात आणखी एक खास बाब अशी की काही दिवसांपूर्वीच प्रवीण तरडे दिग्दर्शित “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला होता. चित्रपटाची रचना, त्यातील भारदस्त संवाद आणि ऍक्शनसिनने भरलेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.
विशेष म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचा टिझर पाहिला आहे आणि त्याने सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक केले आहे. “मला टिझर आवडला! सगळ्यात जास्त बजेट असणाऱ्या मराठीतील ऐतिहासिक चित्रपटाला माझ्याकडून शुभेच्छा”.. अशी एक प्रतिक्रिया प्रभासने या टिझरबद्दल दिली आहे. प्रभासने दिलेली ही प्रतिक्रिया पाहून प्रवीण तरडे भारावून गेला आहे. यासंदर्भात प्रवीण तरडेने एक पोस्ट लिहिली आहे. ‘केलेल्या कामाचं चीज झालं.. आज सरसेनापती हंबीरराव च्या टिझरचं कौतुक बाहुबली प्रभास ने केलं. परवा जवळचे मित्र सुबोध भावे, संजय जाधव, विजु माने, अमित भंडारी अमेय खोपकर यांनीही केल होतं. मित्रांनो तुमचेही खुप आभार असेच पाठीशी राहा.. आज प्रभास ने दिलेल्या शुभेच्छा पुढच्या प्रवासात महत्वाच्या ठरतील.’ गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार मराठी प्रेक्षकांना देखील आपलेसे करताना दिसत आहेत.
पुष्पा या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यावेळी अल्लू अर्जुनने मराठीतुन सगळ्यांना माझा नमस्कार असे एक वाक्य बोलले होते. त्यामुळे मराठी भाषेचा आणि इथल्या प्रेक्षकांचा आदर या दाक्षिणात्य कलाकारांना आहे याची जाणीव होते. सरसेनापती हंबीरराव हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनाअगोदरच चर्चेत आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण तरडे यांनी केले आहे तर गश्मीर महाजनी छत्रपतींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे प्रवीण तरडे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका निभावणार आहे. श्रुती मराठे, मोहन जोशी, सुनील अभ्यंकर, उपेंद्र लिमये, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, राकेश बापट, क्षितिश दाते हे कलाकार देखील महत्वाची भूमिका बजावणार आहेत. चित्रपटाच्या टिझरवरूनच हा चित्रपट सुपर हिट ठरणार त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची आतुरता आहे.