माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत संकर्षण कऱ्हाडेने साकारलेला समीर प्रेक्षकांना खूपच भावला आहे. मालिकेच्या सेटवरचा त्याचा बिनधास्त वावर आणि अफाट विनोदबुद्धी मुळे सह कलाकारांसोबत जुळलेले त्याचे बॉंडिंग हे मालिकेतून स्पष्ट दिसून येते. त्याचमुळे मालिकेतील त्याचे सिन पाहण्यास प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. अशातच तो किचन कलाकार तसेच नाटकांमधूनही सक्रिय आहे. त्यामुळे त्याचे शेड्युल खूपच व्यस्त असलेले पाहायला मिळते, मात्र अशातूनही त्याचा हा उत्साह कुठेही कमी झालेला दिसला नाही. त्याचमुळे तो मालिकेत असावा अशी प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केली होती. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात वावरणाऱ्या संकर्षणने विदर्भाचे नाव उंचावले आहे.
एक उत्तम कवी असण्यासोबतच त्याने नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात देखील पाऊल टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या प्रवासात कुटुंबासोबत वेळ घालवताना जे स्वर्गीय सुख मिळते ते निराळेच. असाच काहीसा अनुभव आता संकर्षण घेताना पाहायला मिळतो आहे. संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नाटकाचे दौरे असो वा कुठली नवीन सुचलेली एखादी कविता तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच संकर्षण आपल्या आईसोबत वेळ घालवताना पाहायला मिळतो आहे. आपल्या सुट्टीचा क्वालिटी टाईम एन्जॉय करत असताना तो चक्क आपल्या आईसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेला आहे.
याप्रसंगी देखील संकर्षणच्या अचाट विनोदबुद्धीची प्रचिती त्याने करून दिली आहे. आईसोबत भाजी खरेदी करतानाचा एक फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच त्याने म्हटले आहे की, ‘कित्ती वर्षांनी मी आईसोबत भाजी मंडईत पिशव्या उचलतोय, भाजी घेतानाचा आईचा कॉन्फिडन्सला तोड नाही. आईच्या हातची चव इतकी कमाल आहे की, भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या आम्हाला घेऊन जा’. संकर्षणच्या या पोस्टला काही तासातच त्याच्या चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. त्याच्या या विनोदावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एवढी प्रसिद्धी मिळवूनही हा कलाकार किती साधा आणि जमिनीवर पाय ठेऊन आहे असेच म्हटले जात आहे.