कलाकार मंडळी वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. संकर्षण कऱ्हाडे हा कलाकार त्यापैकीच एक आहे. गेल्या काही वर्षांपासून संकर्षणकडे नवनवीन प्रोजेक्ट येत आहेत. नाटक, चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या मंचावर वावरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देताना संकर्षणने एक व्हिडिओ टाकलेला पाहायला मिळाला. मात्र या व्हिडिओमुळे संकर्षणला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्याला उत्तर देताना संकर्षणने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही ट्रोल करण्यात आल्याने अखेर त्याने डिलीट करण्याचा निर्णय घेतला.

त्याला असे का करावे लागले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. संकर्षण कऱ्हाडे सध्या नियम व अटी लागू या नाटक निमित्त व्यस्त आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत असताना त्याने रंगमंचावर नारळ वाढवतानाचा एक व्हिडिओ टाकला होता. जागतिक रंगभूमी दिन तुम्हा सगळ्यांना अनंत शुभेच्छा. खरंच रंगभूमीवर वावरण्यासारखं दुसरं सुख नाही, अनंत जन्माची पुण्याई म्हणून मला हे भाग्य मिळतं. नियम व अटी लागू या नाटकाच्या शुभारंभाचा हा व्हिडीओ आहे. पहिलं नारळ वाढवण्याचा मान मला निर्माते आणि दिग्दर्शक ह्यांनी दिला. माझं भाग्य की प्रशांत दामले हा माणूस बापासरखा शेजारी उभा राहून मला साथ देतो, टाळी वाजवून मला बळ देतो हे माझं भाग्य, चंद्रकांत कुलकर्णी सारखे दिग्दर्शक मला मिळतात.

असे कॅप्शन देताना संकर्षण हा व्हिडीओ शेअर करताना दिसला होता. त्या व्हिडिओत नारळ वाढवताना संकर्षणच्या पायात बूट असतात. यावरून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. पण संकर्षणने या ट्रोलर्सना उत्तर देण्याचे ठरवले. त्याला अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागणार हे तो जाणून होता. त्यामुळे अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती असे तो म्हणाला. याचे स्पष्टीकरण देताना संकर्षण असेही म्हणाला की पण ते नाटकातले बूट आहेत. फक्त आणि फक्त स्टेजवर वापरले जातात. नाटकाचा भाग आहेत. पण संकर्षणच्या स्पष्टीकरणावर ट्रोलर्सचे समाधान काही झाले नाही. उलट त्याला आणखी ट्रोल करण्यात आल्याने अखेर त्याने पूर्ण काढून टाकण्याचा निर्णय घेतला.