माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीरच्या भूमिकेने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत श्रेयस तळपदे मुख्य भूमिका निभावणार आणि त्याच्यासोबत आपण काम करणार म्हणून संकर्षणला सुरुवातीला थोडे दडपण आले होते मात्र पहिल्याच भेटीत श्रेयस तळपदेने दाखवलेला दिलखुलासपणा संकर्षणच्या दडपणाला बाजूला सारून गेला. त्याचमुळे मालिकेत यशवर्धन आणि समीरच्या मैत्रीला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली. आज १२ नोव्हेंबर संकर्षणचा वाढदिवस आहे, यानिमित्ताने त्याला सहकलाकार आणि प्रेक्षकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
संकर्षण कऱ्हाडे हा मूळचा परभणीचा. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमधून संकर्षणने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली होती याच शोच्या गेल्या सिजनमध्ये संकर्षणचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे हा देखील सहभागी झाला होता. सध्या दोघेही झी मराठीच्या माझी तुझी रेशीमगाठ आणि घेतला वसा टाकू नको या मालिकांमधून झळकताना दिसत आहेत. लहानपणी हे दोघेही भाऊ खूप खोड्या काढायचे. आवाज देऊन लोकांना थांबवणे आणि लपून बसणे, चिखलाचे छोटे गोळे पाठीवर चिकटवणे, सरांच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये केळे घालणे आणि त्यांची फजिती पाहाणे या व्रात्य खोड्या या दोघांनी अनेकदा केल्या आहेत. लग्नकार्यात, कुणाच्या घरी गेलो तर हमखास ‘आले बाबा स्मिताचे कार्टे’ असं दहशतीनेच अनेकांना म्हणलेलं आम्ही ऐकलंय. आमच्या बऱ्या वागण्यासाठी देवासमोर हात जोडलेलं आईला पाहिलंय आम्ही; पण त्या खोड्या या खोड्याच होत्या.. अशी एक मिश्किल आठवण संकर्षण काढतो. काही महिन्यांपूर्वी संकर्षणला जुळी मुलं झाली चि. सर्वज्ञ संकर्षण कऱ्हाडे, कु. स्रग्वी संकर्षण कऱ्हाडे अशी आपल्या मुलांची नावं जाहीर करून त्यांच्यासोबतचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.
महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो नंतर संकर्षण महेश मांजरेकर यांच्या घरी गेला होता. त्यांच्या नावानं संकर्षणने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने लिहिलं होतं की, “मी महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये होतो, तिथे तुम्हाला माझं काम आवडायचं. वाटलं तर मला सिनेमात घ्या..” त्याने लिहिलेल्या या चिठ्ठीमुळे महेश मांजरेकर यांच्या असिस्टंट कडून फोन आला आणि कोकणस्थ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर नागपूर अधिवेशन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची नामी संधी त्याच्याकडे चालून आली. खोपा, वेडिंगचा शिनेमा, देवाशप्पथ, खुलता कळी खुलेना, तू म्हणशील तसं अशा नाटक चित्रपट आणि मालिकांमधून त्याचा यशाचा प्रवास पुढे चालत राहिला. नुकतेच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील समीरच्या भूमिकेसाठी संकर्षणने तब्बल तीन पुरस्कार पटकावले ह्याबाबत त्याचे मोठे कौतुक करण्यात आले. आज संकर्षण कऱ्हाडेचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आमच्या संपूर्ण टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!!