माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने लोकप्रियता मिळवून दिलेला संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या बाबांच्या कौतुकात मग्न झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या सात आठ दिवसांपासून संकर्षणचे बाबा पंढरपूरला गेले आहेत. तिथे ते पांडुरंगाची आणि विठू माऊलीच्या भक्तांची सेवा करत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक इच्छा असते जी कधीतरी पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा असते. संकर्षणच्या बाबांची देखील अशीच एक इच्छा आता पूर्ण होत आहे. पंढरपूरला जाऊन नेमून दिलेले काम निस्वार्थपणे करणे.
भक्तिरसात तल्लीन होणं अशी त्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची आकांक्षा होती. कार्तिकी एकादशी निमित्त संकर्षणने त्याच्या वडिलांचे काही खास फोटो टाकले आहेत. माऊलीच्या सेवेत रुजू झालेले आपले बाबा आता फोनवर हॅलो न म्हणता चक्क रामकृष्ण हरी म्हणतात. आपल्या बाबांनी स्टेट बँकेत मोठं पद भूषवलं असताना हे सगळं विसरून या वारीत आता ते चक्क सतरंजी टाकून झोपतात. चंद्रभागेत अंघोळ करतात हे सर्व पाहून त्याला त्याच्या बाबांचं कुतूहल वाटत आहे. संकर्षणने त्याच्या खास शैलीत आपल्या बाबांबद्दल भरभरून बोललं आहे. संकर्षण म्हणतो की, आज कार्तिकी एकादशी विठ्ठल विठ्ठल. आमचे बाबा मागील ८ ते १० दिवस पंढरपूरी गेलेत, सेवेला.
आता सेवा म्हणजे काय? तर, तिथे जाउन निस्वार्थीपणे नेमून दिलेले काम करणे.पावत्या फाडणे, भक्तांसाठी नियोजन करणे. गेली अन्नेक वर्षं, हजारो लोक हे करत आहेत. पण मला आमच्या बाबांचं फार कौतुक वाटतं. स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद मध्ये मोठ्ठं पद भूषविलेले, सगळं एैश्वर्य ऊभं केलेले. अनुभवलेले आमचे बाबा तिथे जाउन मस्तं भक्त निवास मध्ये एका हाॅल मध्ये राहतात. सतरंजी टाकून झोपतात, चंद्रभागेवर स्नानाला जातात. विठ्ठल, पांडूरंग आपल्याला हेच सांगतो. आपलं ते सगळं विसरून समरस होणे म्हणजे वारी. म्हणुनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. एरवी सतत फोन करणारे आमचे बाबा गेल्या आठ दहा दिवसांत तिकडेच रमलेत.
आम्हालाच फोन करावा लागतो आणि फोनवर आता रामकृष्ण हरी म्हणतात. हे सगळं करायला वेगळीच ऊर्जा लागते. खरंच, अशी सेवा करणाऱ्या त्या सगळ्यांनाच हा निस्वार्थ भाव शिकवणाऱ्या त्या वारिला. आणि ह्या सगळ्यांची वाट पाहात युगं अठ्ठाविस ऊभ्या असणाऱ्या त्या पांडूरंगाला दंडवत. पांडूरंग आवडायला फार भाग्यं लागतं खरंच. म्हणुन माऊली म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठली आवडीं. सर्व सुखाचे आगरु, बाप रखुमा देवीवरु. हारपली सत्ता मुराली वासना, सांवळा नयना दिसतसे; राम कृष्ण हरी.