अभिनयासोबतच कलाकार मंडळी आपल्या गावी जाऊन शेती करताना पाहायला मिळतात. भरत जाधव, ओंकार कर्वे, प्रवीण तरडे, संपदा कुलकर्णी या कलाकारांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. चित्रपट, मालिका, नाटक अशा क्षेत्रातून काम करत असताना ही कलाकार मंडळी वडिलोपार्जित शेतीकडे वळली आहेत. प्रवीण तरडे आपल्या गावी असलेल्या शेतीबद्दल भरभरून बोलताना नेहमी दिसतो. संपदा कुलकर्णी यांनी आनंदाचं शेत या नावाने गावी सेंद्रिय शेती करून एक आदर्श निर्माण करून दिला आहे. भरत जाधव यांनी देखील आपल्या गावी शेतीत राबतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात त्यांच्या पत्नीचीही त्यांना मोलाची साथ मिळाली होती.
तर अभिनेता ओंकार कर्वे हा देखील सेंद्रिय शेतीकडे वळलेला दिसतो. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचे नाव घ्यावे लागेल. कलर्स मराठीवरील योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत अभिनेता संदीप वसंतराव गायकवाड याने भगवान शिवशंकरांची भूमिका साकारली आहे. मालिकेतून काम करण्यासोबतच तो आपल्या गावी शेती करताना दिसतो. संदीपने आजवर अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संदीप गायकवाड हा मूळचा साताऱ्याचा. कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. कॉलेजमध्ये असतानाच संदीपने नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली होती.
घाडगे अँड सून या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत संदीपने अनंत दिनकर घाडगे ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. पोश्टर बॉईज, यारी दोस्ती, अंगारकी, दगडी चाळ, क्राईम पेट्रोल, श्री गुरुदेव दत्त अशा विविध मालिका चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. दगडी चाळ या चित्रपटात त्याने मुकेशच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेवदत्त मालिकेत संदीपने भगवान शिवशंकरांची भूमिका साकारली होती. योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत तो पुन्हा तेच पात्र साकारत आहे. कलाक्षेत्रात काम करण्यासोबतच तो वेळ मिळेल तसा आपल्या गावी जाऊन शेतीत राबताना दिसतो. संदीप गायकवाडला त्याच्या या यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.