शाहीर साबळे यांचं संपूर्ण कुटुंब कलाक्षेत्राशी निगडित आहे. त्यांच्या दोन्ही लेकींनी मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. नातू केदार शिंदे दिग्दर्शक, अभिनेते म्हणून नावाजले गेले आहेत. लवकरच शाहीर साबळे यांचा जीवनपट महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात देखील करण्यात आली आहे. शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका त्यांची पणती म्हणजेच सना शिंदे निभावणार आहे. सना प्रथमच चित्रपटात नायिकेची भूमिका बजावणार आहे. आपल्या पणजीची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने सना या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे.

याअगोदर सनाने बालकलाकार म्हणून केदार शिंदेंच्या अगंबाई अरेच्चा! चित्रपटात काम केले होते. तेव्हा ती एका छोट्याशा भूमिकेत झळकली होती. वडील केदार शिंदे सोबत ती नेहमीच सेटवर यायची. त्यावेळी दिग्दर्शनातील अनेक बारकावे तिने शिकून घेतले होते. आता प्रथमच कॅमेऱ्यासमोर उभं राहायची संधी तिला मिळाली आहे. मान प्रतिष्ठेला भुरळून न जाता तिने जमिनीवर राहूनच आपले काम करत राहावे; असे केदार शिंदे यांना वाटते. तिला वाढदिवसाच्या दिवशी कानपिचक्या देणारी गोष्टच त्यांनी लिहिली आहे. सनाचा आज वाढदिवस आहे; यानिमित्त केदार शिंदे म्हणतात की, प्रिय सना, तशी रोजच भेटतेस. पण आज हे लिहिण्याचं कारण, तुझा वाढदिवस. दरवर्षी प्रमाणे आजही तो आलाच!

दरवर्षी पेक्षा यंदा त्याचं महत्व तुला जास्त वाटत असावं. कारण या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी तू कॅमेऱ्यासमोर काम करते आहेस. हे येणारं वर्ष तुझ्यासाठी खुप आव्हानात्मक असणार आहे. कॅमेऱ्यासमोर येण्याचं तुझं तू ठरवलस. त्याआधी गेले काही वर्ष मला सहाय्यक म्हणून मदत केलीस. माझ्या शिव्या ओरडा हक्काने खाल्लास. खुप वेळा डोळ्यात पाणी सुध्दा आलं असेल. पण तू, हू का चू केलं नाहीस. माझ्या टीममध्ये तुला राजकुमारीची ट्रिटमेंट कधीच मिळू नये, याकडे माझं लक्ष होतं. कारण, त्याशिवाय मिळणाऱ्या गोष्टीची तुला किंमत कधीच कळणार नाही. आता महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तू माझ्या आजीची म्हणजे, भानुमती साबळे ही भुमिका करते आहेस.
त्यासाठी तुझ्या इतकाच मी सुद्धा उत्साहित आहे. प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक कामावर भरभरून प्रेम केलं. तेच तुझ्याही वाट्याला येवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. सना, कलाकाराचं आयुष्य हे इसीजी सारखं असतं. वर खाली आलेख आपल्याला अस्वस्थ करतो. कधी आनंद तर कधी दु:ख देतो. मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर रहातात एवढं ध्यानात ठेव, तुझाच बाबा.