कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेतून अभिमन्यूला पोलिसांनी अटक केली मात्र लतिका रणरागिणी बनून त्याला सोडवण्यासाठी धडपडत आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिमन्यूची भूमिका समीर परांजपेने साकारली आहे. सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असलेल्या समीरने आपल्या लेकीबाबत घडलेल्या घटनेबद्दल किस्सा सांगितला आहे. काही दिवसांपूर्वीच समीरच्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. आपल्या लेकीच्या बाबतीत खूप हळवा असलेला समीर या घटनेबद्दल सांगताना म्हणतो की, ती आमच्यासाठी परीक्षेची रात्र होती.

४ महिन्यांच्या आमच्या चिमुकलीच्या उजव्या डोळ्याला संसर्ग झाल्याने ती अतिशय चिडचिडी झाली होती. रात्रभर जागून वैतागलेली हि परी जणू आमच्या सहनशक्तीचा ठाव घेत होती. तिचे लक्ष विचलित करण्यासाठी नाना तर्हेच्या युक्त्या करत होतो. आम्ही निरनिराळी गाणी गाऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत केला. शेवटी ए आर रहमान सर का जादू चल गया. छोटी सी आशा गाण्याने आम्हाला खरोखर वाचवले. आणि गाणे ऐकून तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून आम्ही सुखावलो. आता ते तिचे आवडते गाणे झाले आहे आणि माझे देखील. समीरला पहिल्यापासूनच नाटक, एकांकिका आणि सांस्कृतिक क्षेत्राची आवड होती. त्यामुळे समीर हळूहळू कला क्षेत्राकडे वळला.

त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. समीर इंजिनिअर आहे. मात्र त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. इंजिनिअरिंग करत असताना देखील अनेक एकांकिका आणि नाटकांमधून त्याचा अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरूच होता. फिरोदिया करंडक स्पर्धेतून समीरच्या अभिनयाची झलक दिसली होती. अगदी सुरुवातीला समीरला राकेश सारंग यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत छोटासा रोल मिळाला होता. या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र २ या मालिकांत त्यानं नायकाची भूमिका साकारली. भातुकली या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता.