नवा गडी नवं राज्य या मालिकेतील बालकलाकार चिंगी म्हणजेच साईशा भोईर हिच्या आईवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईशाची आई पूजा भोईर यांनी याअगोदर नेहा पत्की यांची तब्बल १६ लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर पूजा भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघड होतो न होतो तोच आता पूजा भोईर यांच्या विरोधात आणखी एका तरुणाने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केलेली आहे. पूजा भोईर या साईशाचे इन्स्टाग्राम अकाउंट हँडल करत असतात. पंकज जाधव हा २५ वर्षांचा तरुण लातूर येथे वास्तव्यास आहे.
पंकजला सोशल मिडियावरचे रिल्स पाहायला आवडायचे. यातूनच तो साईशाच्या अभिनयाचं कौतुक करत असे. तेव्हा पूजा भोईर यांच्याशी त्याची ओळख झाली. हे दोघे एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. पूजा भोईर यांनी पंकजला एका स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. तेव्हा पंकजने १ लाखांची रक्कम गुंतवली होती. त्यावेळी महिन्याला ७ हजारांचे व्याज त्याला मिळू लागले. ७ हजार याप्रमाणे त्याला १० महिन्यात एकूण ७० हजार रुपयांचा फायदा झाला. हे पाहून पंकजचा पूजाने सांगितलेल्या स्कीमवर विश्वास बसला. त्यानंतर पूजाने स्कीम बंद होत असल्याचे सांगितले. आणि या स्कीम ऐवजी आता १० लाखांची स्कीम असल्याचे म्हटले. अगोदर पैसे मिळाल्याने पंकजने विश्वास ठेवत १० लाखांची रक्कम गुंतवली. मात्र अनेक दिवस उलटूनही व्याजाची रक्कम न मिळाल्याने पंकजने पुजाशी संपर्क साधला.
तेव्हा काही तांत्रिक अडचणींचे कारण सांगत तिने ती वेळ मारून नेली. पण त्यानंतरही आपले पैसे मिळत नसल्याचे पाहून पंकजला आपली फसवणूक होत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर पैसे परत मिळाले नाहीत म्हणून पंकजने पूजा भोईर विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पूजा भोईर यांनी अगोदरही काही जणांची फसवणूक केली असल्याचे सांगितले गेले. इन्स्टाग्रामवर ओळख बनवून त्या लोकांच्या संपर्कात राहतात. गप्पा गोष्टी करून त्या त्यांचा विश्वास मिळवतात आणि यातूनच आपल्याकडे काही स्कीम आहेत असे सांगून पैशाचे आमिष दाखवतात. सुरुवातीला छोट्या रकमेवर त्या परतावा देतात मात्र त्यानंतर अधिकची रक्कम गुंतवण्यास सांगून लोकांना लाखोंचा गंडा घालतात असेच चित्र आता समोर येत आहे.