खरंतर कोणत्याही अवार्डच्या मंचावर एकमेकांचे कौतुक करण्यात कलाकारांची स्पर्धा सुरू असते. पण नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सई ताम्हणकर पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा तिला पुरस्कार देताना अभिनेता ललित प्रभाकर याने तिचा झाडून अपमान केला. त्यावर उत्तर म्हणून सईनेही ललितची लाज काढण्याची संधी सोडली नाही. हाच प्रकार दिग्दर्शक हेमंत ढोमे, प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह सगळ्या अवार्ड विजेत्या कलाकारांच्या बाबतीत झाला. गंमत म्हणजे भर स्टेजवर अपमानांचा पाऊस पडत असताना सभागृहात हास्याचे फवारे उडत होते.
भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे अर्थातच भाडिपाने त्यांच्या मजेशीर व्हिडिओं मधून लाखोंचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. बरणीतलं तूप सरळ बोटाने काढायचच नाही हा फंडा वापरून भाडिपाच्या व्हिडिओमध्येही चांगला विचार वाकड्या शब्दात शास्त्र असतं ते म्हणत खपवला जातो. पण जे काही आहे ते तुफान मनोरंजक आहे. भाडियाच्या व्हिडिओलाही मागे टाकेल इतका हसून लोटपोट होईल असा भाडिपाचा अवार्ड फंक्शन रंगला. अभिनेत्री गिरीजा गोडबोले आणि मृण्ययी गोडबोले या नणंदा भावजयीच्या जोडीने या कार्यक्रमाचे निवेदन कोपरखळ्या मारतच केले. सई ताम्हणकरला तिच्याकडूनच सत्तर रूपये मागत अर्चना पूरणसिंग शिष्यवृत्ती दिली.
पुरस्करासाठी सईच्या खिशात फक्त ३५ रूपये होते त्यामुळे उरलेले पैसे प्रिया बापटने दिल्यामुळे सईच्या हातात पुरस्काराची बाहुली आली. लंडनमध्ये सिनेमा करायला जाण्यासाठी सतत सबसिडी घेणाऱ्या हेमंत ढोमेला राणीचा जावई पुरस्कार मिळाला तर आणि काय हवं वेबसिरीजचे यशस्वी सीझन करणाऱ्या प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीला आणि काहीच नको या पुरस्काराने अपमानित करण्यात आलं. चंद्रमुखीच्या निमित्ताने चर्चेत असलेल्या अमृता खानविलकर हिला दीपिका पदुकोणची सवत म्हणून गौरवत सिंड्रेला पुरस्कार दिला. एकूणच पुरस्कार म्हणजे कौतुक सोहळा असतो, पण भाडिपाच्या पुरस्कार सोहळ्यात रंगलेला अपमान सोहळाही कलाकारांनी खूप एन्जॉय केला.