कलाकारांचे संपूर्ण आयुष्य घड्याळाच्या काट्या प्रमाणे शिफ्ट भोवती फिरत असते. मग ती सिनेमाच्या शूटिंगची शिफ्ट असो किंवा मालिकांचा कॉल टाइम. रात्री उशिरापर्यंत शूटिंग केल्यानंतरही सकाळी दिलेल्या वेळेत हजर राहण्यासाठी कलाकार मंडळी जिवाचं रान करत असतात. कलाकार म्हणून कितीही लोकप्रिय झाले तरी प्रसंगी वेळेत पोहोचण्यासाठी काय काय करावं लागतं हे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचतच नाही. काही मातीतले कलाकार असेही आहेत जे रसिक मायबाप प्रेक्षकांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच पडद्यामागे काम करणाऱ्या युनिटचा खोळंबा होऊ नये यासाठी काहीही करायला तयार असतात.
लोकप्रियतेच्या शिखरावर असला तरीही पाय जमिनीवर असलेला विनोदी अभिनेता सागर कारंडे. याने प्रयोगाची वेळ पाळण्यासाठी लोकलच्या गर्दीतून प्रवास करत नाट्यगृह गाठले. त्याने इन्स्टावर फोटो शेअर करत रसिक मायबाप हो तुमच्यासाठी अशी भावना व्यक्त केली आहे. चला हवा येऊ द्या या शोमधून घराघरात पोहोचलेला सागर कारंडेने नेहमीच प्रेक्षकांना भरभरून हसवलं. सागरने सादर केलेल्या अनेक व्यक्तिरेखा, पात्र ही सागरच्या वैविध्यपूर्ण अभिनयाने जिवंत झाली आहेत. विनोदाचे अचूक टायमिंग साधलेल्या सागरकडे केवळ प्रेक्षकांना हसवण्याचीच किल्ली नाही, तर टचकन डोळ्यात पाणी आणण्याचे सामर्थ्यही आहे. हे त्याच्या पोस्टमन या व्यक्तिरेखेने दाखवून दिले आहे.
हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकात सागर सध्या काम करत आहे. या नाटकाची घोडदौड अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. नाटकाचा रात्री साडेआठ वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह मध्ये प्रयोग होता. मुळातच सागर सध्या हवा येऊ द्या या बरोबरच अनेक वेगवेगळे प्रयोगशील उपक्रम करत आहे. या सगळ्या व्यापातून नाटकाच्या ठरलेल्या प्रयोगासाठी वेळेत पोहोचणे ही अर्थातच कसरत होती. हे आव्हान लीलया पेलत सागरने लोकल ट्रेनचा पर्याय निवडला. ट्रेन मधील कमालीच्या गर्दीतुन सागर घामाघुम होत का असेना पण वेळेत नाट्यगृहवर पोहोचला. आणि हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाचा प्रयोग देखील केला.
आपला स्टारडम बाजूला ठेवून फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी वेळेत पोहोचता यावे यासाठीच सागरच्या ट्रेन प्रवासाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. मूळचा नाशिककर असलेला सागर कारंडे अभिनयासोबत उत्तम लेखक देखील आहे. फू बाई फू या विनोदी शोमधून सागरने मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख मिळवली. जलसा, एक तारा,फक्त लढ म्हणा, बायोपिक्स यासारख्या सिनेमातूनही सागरने अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मात्र सध्या तरी विनोदवीर म्हणून सागर त्याच्या चाहत्यांच्या मनात रुंजी घालत आहे. सागरने अतिशय संघर्षातून आपली अभिनयाची कारकीर्द फुलवली असल्याने चाहत्यांकडून नेहमीच कौतुकाची थाप मिळवली आहे.