ह्या गोजिरवाण्या घरात, नांदा सौख्यभरे, स्वामिनी, चंद्र आहे साक्षीला या मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारून ऋतुजा बागवे हिने मराठी मालिका सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. अनन्या या नाटकात ऋतुजाने आव्हानात्मक भूमिका साकारली होती. तिच्या नाटकातील या भूमिकेचं मोठं कौतुक करण्यात आलं. सहाय्यक भूमिका ते प्रमुख अभिनेत्री असा तिचा हा प्रवास खरोखरच उल्लेखनीय ठरला आहे. या प्रवासात टीका होणं आणि कौतुक होणं या गोष्टींचा प्रत्येकालाच सामना करावा लागतो. ऋतुजाने देखील हा अनुभव घेतलेला आहे. ऋतुजा दीपिका पदुकोण सारखी दिसते असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
तर तिच्या दिसण्यावरून अनेकदा तिला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. मात्र अशा टिकांना तिने कायम सकारात्मकतेने पाहिले आहे. आणि त्याचमुळे ऋतुजाचा अभिनय क्षेत्रातला हा प्रवास यशस्वीपणे एक एक टप्पा सर करतो आहे. यशाच्या प्रवासात आता तिने स्वतःचं घर खरेदी करून ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. स्वतःचं घर घेण्याची प्रत्येकाची ईच्छा असते. मराठी सृष्टीतील बहुतेक कलाकारांची अशी स्वप्न पूर्णत्वास उतरताना पाहायला मिळाली आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. तर लीना भागवत यांनीही गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर स्वतःच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला होता.
ऋतुजाने देखील असे एक स्वप्न पाहिले आणि ते आता सत्यात उतरत असल्याने याचा तिला अतिशय आनंद होत आहे. खरं तर ऋतुजाच्या आईनेच तिला हे स्वप्न दाखवलं असल्याने तिने आपल्या आई वडिलांचे आभार मानले आहेत. स्वतःच्या कमाईने घर खरेदी केल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद ऋतुजाने एका खास पद्धतीने व्यक्त केला आहे. याबाबत ती म्हणते की, ‘जेव्हा लोक विचारतायत की वय झालंय लग्न कधी करणार. तेव्हा माझी आई म्हणाली वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावस वाटेल तेव्हा लग्न कर. पण त्या आधी स्वकर्तृत्ववान हो, स्वतःचं घर घे. आई मनापासून धन्यवाद, हे स्वप्न तू दाखवलंस. तू खरंच खूप हुशार आणि धाडसी आहेस.
बाबा तूमच्या शिवायही हे शक्य झालं नसतं. आईने स्वप्न दाखवलं पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी. वडील या नात्याने कायम माझ्या पाठीशी राहिलात, बापमाणूस. भौतिक गोष्टित मी यश नाही मानत ना समाधान शोधत. पण तूमचं स्वप्न पूर्ण करू शकले हयाचा आनंद खुप आहे. जो मी शब्दात नाही मांडू शकत. तुमच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि अभिमानाने पाणावलेले डोळे मला आणखी कठोर परिश्रम करण्याची शक्ती देतात. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुमच्यासारखे पालक मिळाले.’