मराठी कलाकार मंडळी बॉलिवूड चित्रपटात झळकले की चित्रपट हमखास चालतात असा एक समज सर्वरूढ झाला आहे. अगदी टॉलिवूड सृष्टीत देखील श्रेयस तळपदे, शरद केळकरच्या डबिंगने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहेत. रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. त्याच्या बहुतेक चित्रपटात मराठी कलाकारांना महत्वपूर्ण भूमिका दिली जाते. सर्कस, सिंघम, गोलमाल अशा चित्रपटात बरेचसे मराठी कलाकार दिसले आहेत. सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाची टीम चला हवा येऊ द्या च्या मंचावर गेली होती.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्येही या टीमने धुमाकूळ घालत कलाकारांचे कौतुक केले होते. रणवीरने तर गौरव मोरे सोबत छोटेसे स्किट देखील सादर केले. ही धमालमस्ती चालू असताना रोहित शेट्टीने चित्रपटात मराठी कलाकारांना घेण्याचे कारण सांगितले. तो म्हणतो की, हा प्रश्न मला खूप ठिकाणी विचारण्यात येतो, त्याच्यामागे एक खास कारण आहे. मराठी कलाकार हे एकदम साधे आणि प्रतिभावान असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो. चांगला अभिनय येतो म्हणून कलाकार मंडळी नखरे करताना दिसतात. पण मराठी कलाकारांचे एक वैशिष्ट्य आहे, की ते कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. माझे चित्रपट १०० कोटींचा बिजनेस करतात, यातला ६० टक्के वाटा महाराष्ट्रातून येतो हे तो आवर्जून सांगताना दिसला.
आज २३ डिसेंबर रोजी रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, अश्विनी कळसेकर, उदय टिकेकर असे मराठी कलाकार झळकणार आहेत. रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ जाधवचे सूर गोलमाल चित्रपटापासून जुळले. रणवीर आणि सिध्दार्थची जुळून आलेली केमिस्ट्री मराठी प्रेक्षकांना चांगलीच माहीत झाली आहे. सिध्दार्थसोबत मैत्री झाल्यानंतर रणवीरने भर अवॉर्ड सोहळ्यात दीपिकासोबत ओळख करून दिली होती. सिध्दार्थच्या ड्रेस सेन्समुळे त्याला मराठीतला रणवीर सिंग अशीही उपमा दिली जाऊ लागली आहे. या दोघांचे आता रोहित शेट्टी सोबत चांगलेच सूर जुळले आहेत. त्यामुळे सिद्धार्थ सोबत आणखी बरेचसे मराठी सेलिब्रिटी रोहित शेट्टीच्या चित्रपटाचा भाग बनले आहेत.