सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातून प्रसिद्धीस आलेला गायक रोहित राऊत आता मालिकेतून अभिनय क्षेत्रातही एन्ट्री करत आहे. आजवर रोहित राऊत हा गायक आणि कम्पोजर म्हणून या इंडस्ट्रीत नाव लौकिक करताना दिसला आहे. मात्र प्रथमच तो आता अभिनय क्षेत्रात उतरून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. झी मराठीवरील ३६ गुणी जोडी ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. अमूल्या आणि वेदांत लवकरच एकमेकांना प्रेमाची कबुली देणार आहेत मात्र दोघेही विरुद्ध स्वभावाचे नायक नायिका आपल्या इगोला मध्ये आणताना दिसत आहेत.

वेदांत त्याच्या प्रेमाची कबुली द्यायला तयार होतो मात्र काहीतरी निमित्त त्यांना पुन्हा वेगळं करतं. अशातच आता वेदांत आणि अमूल्या एका ट्रीपला गेलेले पाहायला मिळणार आहेत. या ट्रिपमध्ये वेदांतचा मित्र म्हणून रोहित राऊत मालिकेत एन्ट्री घेत आहे. इथेच त्याची अमूल्याशी ओळख होते. दोघेही एकमेकांना प्रेमाची कबुली देण्याअगोदर आता हा मित्र अमूल्यावर भाळला आहे. दोघात तिसरा अशी त्याची भूमिका असल्याने मालिका एका रंजक वळणार आलेली पाहायला मिळत आहे. अमूल्या आणि वेदांत दोघांच्या नात्यामध्ये आलेला हा मित्र त्यांच्यात समेट घडवून आणणार की दुरावा निर्माण करणार हे तुम्हाला येत्या काही भागातच पाहायला मिळणार आहे. दरम्यान रोहितला मालिकेत पाहून त्याच्या चाहत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.

सारेगमप लिटिल चॅम्प्स नंतर रोहित राऊतने गाण्यामध्ये करिअर केले. अनेक स्टेज शो साठी त्याने परफॉर्मन्स केले. संजय जाधव यांच्या दुनियादारी चित्रपटातून त्याला पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर रोहितने मागे वळून पाहिलेच नाही. चित्रपटासाठी त्याने अनेक गाणी गायली. स्वतःचे अल्बम सुद्धा केले. तर कधी तो इंडियन आयडॉल सारख्या हिंदी रियालिटी शोमध्येही सहभागी झालेला पाहायला मिळाला. गण्यातच करिअर करणाऱ्या रोहितने पुढे जाऊन कम्पोजरचीही भूमिका निभावली. आता एक वेगळा प्रयोग म्हणून की काय रोहित चक्क आता मालिकेतून अभिनय करताना दिसणार आहे. ३६ गुणी जोडी मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होत होती.
मात्र आता या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. कारण ही मालिका आता ११ ऑगस्ट पासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी बावकर हिची लवंगी मिरची ही मालिका एक्झिट घेत आहे. सोबतच सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या कार्यक्रमामुळे झी वाहिनीने हे बदल घडवून आणले आहेत. रोहितच्या अभिनयाची ही झलक पाहायला त्याचे चाहतेही तेवढेच उत्सुक आहेत.