बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन आठवडे होत आहेत मात्र तरीही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. गुजराथमधील अनेक मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती त्यासाठी तीस चाळीस किलोमीटर अंतर पार करून ही मंडळी थिएटरमध्ये आली होती. पूर्वी चित्रपट पाहण्यासाठी लोक नटूनथटून येत असत असे ऐकले जायचे. बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहण्यासाठी महिला वर्ग नटूनथटून अगदी नऊवारी साडी नेसून चित्रपट गृहात गर्दी करत आहेत.
महिलांसाठी हा एक सोहळाच आहे असे हे प्रेक्षक प्रतिक्रिया देतात. बाईपण भारी देवा या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे सहा बहिणीची कथा आहे. त्यातील पाहणाऱ्याचे प्रत्येकीशी काहीनाकाही तरी सूर जुळले आहेत. ही आपलीच गोष्ट आहे असे समजून या महिला वर्गाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेवर कलाकारांनीच नव्हे तर अगदी कॉस्टयुम डिझायनरने मोठी मेहनत घेतली होती. प्रत्येकीच्या स्वभावाशी मिळतेजुळते पेहराव त्यांना देण्यात आले होते. जया हे पात्र रोहिणी हट्टंगडी यांनी निभावले. आपल्याला मूल नाही या विचाराने ती स्वतःचे मन मारत जगत असते. जयाला अशा परिस्थितीत सांभाळून घेणाऱ्या त्यांच्या समजूतदार नवऱ्याचा म्हणजेच अरुण देसाई यांचा सगळ्यांना हेवा वाटतो.
अरूणची भूमिका सतीश जोशी यांनी साकारलेली आहे. सतीश जोशी हे अभिनेते मुळीच नाहीत मात्र या भूमिकेसाठी केदार यांनी निवड केली. चित्रपटासाठी जे लोकेशन ठरले होते त्या घरी अजित भुरे आणि केदार शिंदे गेले होते. तिथेच सतीश जोशी यांनी दार उघडले. सतीश जोशी यांचा हसरा चेहरा पाहुन केदारने अरूणच्या भूमिकेसाठी अजित भुरे यांना नाव सुचवले. ‘पण हे कलावंत नाहीत त्यांनी कधीच अभिनय केला नाही’ असे म्हटल्यानंतरही केदार त्यांच्या मतावर ठाम राहिले. सतीश जोशींना चित्रपटाचा प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनीही लगेचच आपला होकार कळवला. अभिनयाचे कुठलेही आढेवेढे न घेता सतीश जोशी यांनी जयाच्या नवऱ्याची भूमिका चोख बजावली हे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्याही लक्षात आलेच असेल.