रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट वेड येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट होऊन आता जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत. वडिलांच्या इच्छेखातर रितेशने मराठी सृष्टीत येण्याचे धाडस केले. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून त्याने लई भारी, माऊली, बालक पालक सारखे जवळपास ५ चित्रपट बनवले. यातूनच त्याने आता दिग्दर्शक म्हणूनही आपले पाऊल टाकले आणि जेनेलिया सोबत वेड चित्रपट बनवण्याचे ठरवले. ट्रेलर मधील जेनेलियाचा मराठी संवाद पाहून प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यास उत्सुकता दर्शवली आहे.
आपल्याला मराठी सृष्टीत यायला एवढा वेळ का लागला त्यावर जेनेलिया म्हणते की, कारण रितेशनेच हा चित्रपट बनवायला उशीर केला. रितेश आणि जेनेलिया सध्या विविध माध्यमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दाक्षिणात्य चित्रपट मजीली या चित्रपटावर आधारित असलेल्या वेड मध्ये तुम्हाला दोन नायिका पाहायला मिळणार आहेत. सत्याचे प्रेम एका दुसऱ्याच मुलीसोबत असते मात्र ती मुलगी आपल्याला सोडून गेल्याने सत्या भरकटत जातो मात्र चित्रपटाच्या शेवट त्याच्यावर निस्वार्थपणे एकतर्फी प्रेम करणारी श्रावणी सत्याचे मन जिंकताना पाहायला मिळणार आहे. सत्याचे ज्या मुलीसोबत प्रेम असते ती मुलगी म्हणजे अंशुची भूमिका अभिनेत्री जिया शंकर साकारणार आहे. चित्रपटात अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
जिया शंकर वेड चित्रपटामुळे मराठी सृष्टीत चांगलीच चर्चेत आली आहे. जिया शंकर ही तेलगू तसेच तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे. २०१३ साली जियाने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. तेलगू, तमिळ भाषेसोबतच जियाला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान आहे. मुंबईत बालपण गेल्याने तिला मराठी चांगली अवगत आहे. लव्ह बाय चान्स, ट्विस्ट वाला लव्ह, क्वीन्स है हम, प्यार तुने क्या किया, मेरी हानिकारक बिवी, लाल ईश्क, कातेलाल अँड सन्स, पिशाचीनी अशा हिंदी मालिकांमधून तिने प्रमुख भूमिका साकारल्या. जिया अनेकदा मराठी भाषेतून रील बनवताना दिसली आहे. वेड हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असला तरी या भाषेवरील प्रभुत्वामुळे ती भविष्यात आणखी काही प्रोजेक्ट स्वीकारेल अशी आशा आहे.