कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेला आता मोठे वळण लागले आहे. मालिकेत रणजितच्या कारकीर्दीवर गालबोट लागले त्यामुळे त्याची वर्दी उतरवण्यात आली होती. त्यानंतर संजीवनीने स्वतः पीएसआय बनून शोध मोहीम सुरू केली. आता लवकरच रणजित ढाले पाटील यांची वर्दी पुन्हा एकदा त्याच मानाने त्याला मिळणार आहे. प्रेक्षक इतके दिवस ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता लवकरच प्रेक्षकांना मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

मालिकेत रणजित शेतकऱ्यांची बैठक घेतो आणि त्यात तो शेतकऱ्यांची बाजू घेताना दिसतो. शेतकऱ्यांचा माल काहीही करून बाजारपर्यंत पोहोचलाच पाहिजे असे तो सांगतो. यावर दादासाहेब आक्षेप घेतात आणि रणजितच्या निर्णयावर चीडतात. राजश्री दादासाहेबांना शांत करते आणि पुढचं सगळं मी सांभाळते असं म्हणते. शेतकऱ्यांचा माल ती जगनला गोदामात ठेवायला सांगते आणि पुढं काय करायचं ते त्याला खुणावते. गोदामात लागलेल्या आगीची बातमी संजीवनीला समजते ती शेतकऱ्यांचा माल आगीतून वाचवण्याचा प्रयत्न करते मात्र आगीच्या लोटात अडकल्याने संजीवनी बेशुद्ध होऊन खाली पडते. रणजित गोदमाजवळ येऊन तिथे आजूबाजूला बघतो तर त्याला संजीवनीची गाडी दिसते. म्हणून तो आग लागलेल्या गोदामात जाऊन संजीवनीला शोधून काढतो आणि तिला घरी आणतो. राजश्री आणि दादासाहेबांच्या या कटकरस्थानांचा उलगडा कधी होईल याचीच प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत त्यामुळे आता लवकरच तो क्षण मालिकेत येऊन ठेपला असल्याचे चित्र दिसत आहे.

राजश्री आणि दादासाहेबांनी आजवर केलेल्या कटकारस्थान रणजीतला समजणार आहेत त्यावर रणजितची कशी प्रतिक्रिया असेल हेही रंजक होणार आहे. दादासाहेबांना आणि राजश्रीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा आता लवकरच मिळणार आहे. हा उलगडा होत नव्हता तोवर प्रेक्षकांनी या मालिकेवर आणि रणजितच्या भूमिकेवर काहीशी नाराजी दर्शवली होती. इतके दिवस होऊनही आपल्या वाहिनीवर आणि दादासाहेबांवर विश्वास ठेणारा रणजित एवढा कसा वेंधळा असू शकतो अशी मालिकेबाबत प्रतिक्रिया दिली जात होती. त्यामुळे लवकरच रणजित आपल्यावर झालेले आरोप खोडून काढत पुन्हा एकदा एसीपी बनून दमदार एन्ट्री घेताना दिसणार आहे. हा उत्कंठा वाढवणारा क्षण मालिकेत येत्या काही भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट सर्वानाच रुचणार असल्याने या भागाची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे.
