स्टार प्रवाह वाहिनीवर मन धागा धागा जोडते नवा ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. आनंदीच्या संघर्षाची कहाणी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. दिव्या पुगावकर आणि अभिषेक रहाळकर या मालिकेतून आनंदी आणि सार्थकची भूमिका निभावत आहेत. तर हुशार पण नैराश्यात असलेल्या आदर्शच्या भूमिकेत अभिनेता रणजित जोग झळकत आहे. या मालिकेमुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेता रणजित जोगचे मालिका सृष्टीत पुनरागमन होत आहे. हॅम्लेट नंतर रणजित अशीच आहे चित्ता जोशी या नाटकातून काम करताना दिसला. जोग कुटुंब चार पिढ्यांचा अभिनयाचा वारसा जपून ठेवताना दिसत आहे.
रणजितचे वडील संजय जोग हे देखील हिंदी मराठी चित्रपट अभिनेते होते. जोग कुटुंब हे मूळचे नागपूरचे. रणजितचे आजोबा मुकुंद जोग आणि आजी उषा जोग या कलासृष्टीत कार्यरत होते. तर पणजोबा नाना जोग हे विदर्भ साहित्य संघाच्या संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जात. एक उत्कृष्ट नाट्यकर्मी तसेच लेखक म्हणूनही कला क्षेत्राशी ते निगडित होते. आताच्या हॅम्लेट हे शेक्सपिअर वर आधारित असलेल्या नाटकाचे लेखन त्यांनीच केले होते. तर संजय जोग यांनी देखील आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी चित्रपट तसेच बॉलिवूड चित्रपटातूनही काम करण्यास सुरुवात केली. आम्ही दोघे राजा राणी, नवरी मिळे नवऱ्याला, जिगरवाला, बेटा हो तो ऐसा अशा अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या.
रामायण मालिकेतील भरतची भूमिका संजय जोग यांनी साकारली होती. त्यांनी साकारलेला एक आज्ञाधारी भाऊ हि भूमिका अजरामर झाली. कला क्षेत्रातील दैदिप्यमान प्रवास चालू असतानाच त्यांचे १९९५ साली किडनी विकाराने निधन झाले होते. संजय जोग यांच्या पत्नी नीता जोग या प्रसिद्ध वकील आहेत. तर रणजित आणि नताशा ही दोन अपत्ये त्यांना आहेत. रणजितने एक होतं पाणी, आव्हान, ही पोरगी कोणाची, मनातल्या उन्हात, चोरीचा मामला, लपून छपून यासारखे चित्रपट. तसेच नकळत सारे घडले, श्री लक्ष्मीनारायण, विवाहबंधन, तुझ्या इश्काचा नाद खुळा, सावधान इंडिया अशा मराठी तसेच हिंदी मालिकांमधून तो झळकला आहे. रणजीतने अभिनयासोबतच ‘निताशा फिल्म्स इंटरनॅशनल’ ही निर्मिती संस्था उभारली आहे.