स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. नुकतेच टीआरपीमध्ये या मालिकेने क्रमांक एकचे स्थान पटकावले. अशात आता वेगवेगळ्या कट कारस्थानांनी या मालिकेला आता पर्यंत खूप वेगवेगळी वळणे मिळाली आहेत. तर आता पुन्हा एकदा या मालिकेत सर्वांना चकित करणारा आणखीन एक बदल लवकरच घडणार आहे. रंग माझा वेगळामध्ये सुरुवातीला दीपा आणि कार्तिक या दोघांची जोडी खूप गाजली. सौंदर्या इनामदार हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अशात काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये दीपाची मैत्रीण अश्विनी तिच्या पतीला भेटण्यासाठी दुबईला जाते असे दाखवण्यात आले होते.
दीपा अजूनही तिच्या मैत्रिणीच्याच घरात राहते. सुरुवातीला मालिकेत दीपाची मैत्रीण साक्षी होती. साक्षी हे पात्र अभिनेत्री मानसी घाटे साकारत होती. काही कारणास्तव तिने ही मालिका सोडली. त्यामुळे निर्मात्यांनी मालिकेत अश्विनी हे पात्र घेतले. आता मालिकेत आधी दाखवण्यात आल्या प्रमाणे अश्विनी ही दुबईला गेली असून ती अद्याप परतलेली नाही. त्यामुळे लवकरच ती पुन्हा येणार असल्याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. अश्विनी हे पात्र आता पर्यंत अभिनेत्री वैशाली भोसलेनी साकारलं. पण काही महिन्यांपूर्वीच तिने ही मालिका सोडली. मालिका सोडत असताना तिने प्रेग्नेंट असल्याचं कारण सांगितलं होतं.
त्यानंतर या मालिकेत अश्विनी अजून दिसली नाही. मात्र आता हे पात्र पुन्हा येणार असल्याने नेमकी कोणती अभिनेत्री अश्र्विनीची भूमिका साकारणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत रेशमा शिंदे, आशुतोष गोखले, अनघा भागरे, हर्षदा खानविलकर हे कलाकार प्रमुख भूमिका बजावत आहेत. मालिकेतील सर्वच कलाकार आपल्या अभिनयाला पूर्णपणे न्याय देत आहेत. त्यामुळेच आज ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मोठी पसंतीची बनली आहे.