स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या रिऍलिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. रविवारी २१ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ८ वाजता हा महाअंतिम सोहळा प्रसारित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच या शोच्या महाअंतिम सोहळ्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. या रिऍलिटी शोमध्ये अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत दिसले तर अभिनेता पुष्कर क्षोत्री याने या शोची सुत्रसंचालनाची धुरा समर्थपणे सांभाळली. बेला शेंडे, आदर्श शिंदे आणि सलील कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन सहभागी स्पर्धकाला मिळत गेले. मी होणार सुपरस्टार या शोचे खास वैशिष्ट्य असे होते की या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला वयाची कुठलीही अट नव्हती.
त्यामुळे अगदी चार वर्षांच्या चिमुरड्यापासून ते वृद्धांपर्यंत अशा स्पर्धकांनी हजेरी लावून आपली कला या मंचावर सादर केली. महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. लोककलेचे शिलेदार, वर्षा एखंडे, जिज्ञासा ग्रुप, डॉ राम पंडित या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होत असताना सांगलीच्या ‘लोककलेचे शिलेदार’ या ग्रुपने विजेते पदाचा मान पटकावला. या विजेत्या टीमला ३ लाखांचा धनादेश देण्यात आला. विजयाची ट्रॉफी मिळताच लोककलेचे शिलेदार या ग्रुपने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर भारावून जाताना ते म्हणाले की, ‘आम्हाला या शोमुळे आमची लोककला सादर करण्याची संधी मिळाली, स्टार प्रवाह वाहिनीमुळे हे सर्व शक्य झालं.
या मंचाने आम्हाला खूप काही शिकवलं. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत आम्ही नवनवीन प्रयोग केले. आदर्श शिंदे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी यांसारखे गुरू आम्हाला मार्गदर्शक म्हणून मिळाले’.मुंबईच्या डॉ राम पंडित यांनी या शोचे उपविजेतेपद पटकावले. त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असून दोन लाखांचा धनादेश त्यांना देण्यात आला. तर तृतीय क्रमांक गोव्याच्याजिज्ञासा ग्रुपने पटकावला असून त्यांना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संगमनेरच्या वर्षा एखंडे हिला ५० हजारांचा धनादेश देण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून निवड चाचणीमधून ७१ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.
त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली कला सादर केली. या ७१ जणांमधून २६ स्पर्धक मेगा ओडिशनमध्ये सिलेक्ट करण्यात आले. या सर्वांमधून दोन ग्रुप आणि दोन स्पर्धकांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली पाहायला मिळाली. लोककलेचे शिलेदार हा ग्रुपने मी होणार सुपरस्टार या शोचे विजेते पद पटकावल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!