खुपते तिथे गुप्तेच्या रविवारच्या एपिसोडमध्ये सुबोध भावेला आमंत्रण दिले आहे. या मुलाखतीत सुबोध भावे यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या प्रेम पत्राबद्दलही एक खुलासा केला आहे. तर राहुल गांधी यांच्या बायोपिक बद्दल टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. दादासाहेब फाळके यांना सुबोधने फोन करून भावनिक आवाहन केले आहे. तर सुबोध भावेला कुठल्या गोष्टी खुपतात कुठल्या नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या एपिसोडची वाट पाहत आहेत. येत्या रविवारी २० तारखेला हा एपिसोड प्रेक्षकांची पसंती मिळवणार आहे हे नक्की. घराचं लॉक बरोबर लागलं आहे की नाही हे पाहणारी अनेक मंडळी आहेत.

पण सुबोध भावे तर चक्क अकॅडमीचंही लॉक बरोबर लागलं आहे की नाही हे पाहण्यासाठी मित्राला रात्री अपरात्री तिथे पाठवायचा. हा किस्सा सांगताना सुबोध म्हणतो की, माझा विश्वास नाही माझ्यावर. घरातलं सोड, मी कॉलेजमध्ये असताना मुलांनी एक ग्रुप बनवला होता. अकॅडमीच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर माझं घर अकॅडमीचं ऑफिस यांच्यामध्ये एक मित्र राहत होता. मी त्याला रात्री १२ वाजता उठवून अकॅडमीच्या ऑफिसला जायला सांगायचो. की कुलुप लावलं आहे की नाही बघ म्हणून, हे मी रोज करायचो. राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा तू व्यक्त केली होतीस, त्यावेळी लोकांनी तुला ट्रोल केलं होतं असे अवधूत विचारतो. त्यावर सुबोध म्हणतो की, कुठलाही बायोपिक करायचा असेल तर त्या व्यक्तीचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो.

मला हे जाणून घ्यायचं होतं, मी कुठल्या भूमिका कारायच्यात याचं स्वातंत्र्य मला आहे. तुम्ही बघायचा की नाही याचं स्वातंत्र्य तुमचं आहे. मी काही फोर्स केलेला नाही की, मी राहुल गांधींची भूमिका केली की तुम्हाला ती बघायला यायलाच पाहिजे. तुमच्या घरात भाजी कुठली करायची हेही तुमची बायको तुम्हाला विचारत नसेल. आणि तुम्ही मला मी राहुल गांधींची भूमिका करायची की नाही हे सांगायला जाताय असे म्हणत सुबोध त्याचा संताप व्यक्त करतो. तू काशिनाथ घाणेकर यांचा बायोपिक नाकारला होता असं अवधुतने विचारले. सुबोध म्हणतो की, हो मला कंटाळा आला होता. दादासाहेब फाळके यांना फोन करून म्हणतो, जी इंडस्ट्री तुम्ही उभी केली भारताच्या चित्रपटाची मुहूर्तमेढ तुम्ही रोवली, त्या ठिकाणी फारशी काही चांगली परिस्थिती नाही. मराठी चित्रपटांना चांगले दिवस यावेत अशी इच्छा यावेळी सुबोधने त्यांच्याजवळ व्यक्त केली.