झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघव आणि आनंदीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले असतात. त्यावेळी चिंगी तिच्या नव्या आईबद्दल भरभरून बोलताना दिसते. आता राघव आनंदीचा संसार सुखात सुरू आहे, अशातच आता योजनाची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात तुमचा मुलगा खूप आजारी आहे असा योजनाला एक फोन येतो. त्यावेळी योजना खूप घाबरून जाते आणि आई आजारी आहे असे खोटे सांगून ती आनंदीचा निरोप घेऊन घरी जायला निघते. योजना एकटीच बदलापूरला राहते तिचे आईवडील नाशिकला असतात.
मग अचानक तिची आई तिच्याजवळ कशी राहायला येते असा संशय आनंदीच्या मनात घोळत असतो. योजना नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतीये हे आनंदीच्या लक्षात येते. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या धामधुमीत ती या गोष्टीकडे कानाडोळा करते. योजना खोटं का बोलली याचा उलगडा मालिकेतून लवकरच होणार आहे. या तिच्या येण्याने राघव आणि आनंदीच्या सुखी संसारात पुन्हा विघ्न तर येणार नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी मालिकेत वर्षा आणि नंदूचे लग्न पार पडले. नंदूच्या बहिणीमुळे लग्न होतेय की नाही असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला होता. वर्षाचे अगोदरच लग्न झाले आहे हे कळल्यावर बहिणीने विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतर तिनेच त्यांच्या लग्नाला होकार दिलेला पाहायला मिळाला.
ट्विस्ट अँड टर्न्स असल्याशिवाय मालिका रंजक होत नाही हे आता लेखकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. त्यामुळे योजनाचे पात्र आणून या मालिकेत नवा ट्विस्ट आणण्याचा घाट घातला जात आहे. योजनाचे पात्र अभिनेत्री आकांक्षा गाडे हिने साकारले आहे. आकांक्षा गाडे ही पृथ्वी थिएटरशी जोडलेली आहे. त्यामुळे हिंदी नाटक, मराठी मालिका, चित्रपट असा अभिनय क्षेत्रातला तिचा प्रवास सुरू आहे. सारे तुझ्याचसाठी, अस्सं सासर सुरेख बाई, डिअर जिंदगी, शेक्सपिअरचा म्हातारा अशा नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच आकांक्षा उत्कृष्ट नृत्यांगना आहे. नृत्याचे धडे गिरवल्यानंतर वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी तिने नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम केले. तर शांघाय या हिंदी चित्रपटासाठी तिने सहाय्यक नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम पाहिले होते. नवा गडी नवं राज्य या मालिकेत आकांक्षाच्या येण्याने मालिकेला नवे वळण मिळाले आहे.