भरत जाधव यांनी मराठी चित्रपट तसेच नाट्य सृष्टीला भरीव योगदान दिलं आहे. त्यांचं सही रे सही हे नाटक आजही प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना दिसत आहे. मात्र नाट्यगृहात असलेल्या सोईंचा अभाव कलाकारांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठी देखील अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदार यांची अशाच मुद्द्याला हात घालणारी पोस्ट चर्चेत आली होती. बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरिन इन्फेक्शन घेऊन घरी जाते. विशाखाच्या या बिनधास्त बोलण्यावरून नाट्यगृहांची दुरावस्था कळून चुकली. भरत जाधव हे देखील नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत भाष्य करताना दिसले आहेत.
त्यामुळे आता नाट्यगृह व्यवस्थापन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो! असे म्हणून त्यांनी या मुद्द्यालाच हात घातला आहे.
काहीच दिवसापूर्वी भरत जाधव सही रे सही या नाटकाच्या प्रयोगाला गेले होते. हॉल मध्ये काही पंखे बंद होते. त्यात एसी देखील पूर्णपणे ठप्प होता. प्रेक्षकांनी बोंब मारायला सुरुवात केली त्यावेळी नाटक मध्येच थांबवून भरत जाधव यांनी स्वतः महापौर यांना फोन केला. ‘जोपर्यंत पंखे नीट करणार नाहित, प्रयोग असाच थांबून राहील’ असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर हे नाटक अक्षरशः दीड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात इथे आमच्या स्टेजवर, चेहऱ्यावर हजार हजार व्हॅटचे लाईट्स आहेत.
आम्हीपण घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा उपस्थितांना स्टेजवरील खरी दुरावस्था कळली. भरत जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्याने शेअर केलेला हा किस्सा सांगितला आहे. त्यामुळे आता हा व्यवस्थापनाचा विषय पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो असा मुद्दाच त्यांनी मांडला आहे. भरत जाधव यांनी वारंवार असे दुरावस्थाचे विषय समोर आणलेले आहेत. भर उन्हाळ्यात नाट्यगृहातील एसीची झालेली दुरावस्था असो किंवा टॉयलेटमधील स्वच्छतेचा अभाव हे त्यांनी याअगोदर देखील समोर आणले होते. मात्र या विषयात कुठेतरी ठोस उपाय योजना करणे तितकेच गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले आहे. केवळ कलाकारच नव्हे तर प्रेक्षकांना देखील पैसे देऊन हा त्रास सहन करावा लागत आहे.