प्रिया बेर्डे यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांच्या आई लता अरुण या नाट्य, सिने अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तर वडील अरुण कर्नाटकी यांनी हिंदी मराठी चित्रपटांसाठी काम केलेले होते. आजोबा वासुदेव कर्नाटकी हे दाक्षिणात्य चित्रपटासाठी काम करत असत. मास्टर विनायक हे चुलत चुलते तर बेबी नंदा या चुलत आत्या, त्यांचे मावस आजोबा भालजी पेंढारकर, तर दुसरे मावस आजोबा म्हणजे व्ही शांताराम. ज्येष्ठ अभिनेत्री माया जाधव या मामी, शहाजी काळे हे मामा त्यामुळे ह्या एवढा मोठ्या कलाकारांच्या गोतावळ्यात प्रिया बेर्डे यांचे बालपण गेले.
सुपरहिट अशी ही बनवाबनवी चित्रपटात काम करत असताना प्रिया बेर्डे यांचे वय १७ होते. म्हणून करार नाम्यावर अरुण कर्नाटकी यांनी स्वाक्षरी केली होती. बालपणापासूनच प्रिया बेर्डे चित्रपटातून काम करत होत्या. त्यांना नृत्याचे धडे मामी माया जाधव यांच्याकडून गिरवले होते. एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या लहानपणीच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी बॉलिवूडची अभिनेत्री माझी वर्गमैत्रिण होती याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. दादर येथील राजा शिवाजी ही प्रिया बेर्डे यांची शाळा. आईवडील दोघेही कला सृष्टीशी निगडित असल्याने शाळेतून त्यांना तशीच वागणूक दिली जात होती. त्यामुळे कित्येकदा सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांना सहभागी करून घेतले जात होते.
अरुण कर्नाटकी यांच्या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. याच शाळेत प्रिया बेर्डे सोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिकत होती. एकाच वर्गात एकाच बेंचवर या दोघी मैत्रिणी बसत होत्या. चौथी इयत्तेपर्यंत आम्ही एकाच बेंचवर बसत होतो, असे प्रिया बेर्डे या मुलाखतीत म्हणाल्या. ज्येष्ठ अभिनेत्री मामी माया जाधव यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवल्यामुळे प्रिया बेर्डे यांचे स्टेज डेअरिंग वाढले होते. याचदरम्यान त्यांनी परदेशात नृत्याचे कार्यक्रम देखील केले होते. आई लता अरुण सोबत एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटात दोघींना एकत्रित काम करण्याची संधी मिळाली होती. याच चित्रपटात लता अरुण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या.