कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७ वाजता सिंधुताई माझी माई ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला होता. मात्र आता प्रथमच त्यांचा हा भावस्पर्शी प्रेरणादायी प्रवास छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक १५ ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत सुंधुताई सपकाळ यांच्या बालपणीची म्हणजेच चिंधीची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडे साकारत आहे. तर किरण माने त्यांच्या वडिलांची भूमिका निभावत आहेत.
सिंधुताई माझी माई मालिकेत योगिनी चौक, अभिजित झाडे, शर्वरी पेठकर, आनंद भुरचंडी हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचेही मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात पुनःपदार्पण होत आहे. प्रिया बेर्डे यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायामुळे उद्योजिका म्हणून यश मिळवण्यासोबतच राजकारणात देखील प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे प्रिया बेर्डे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. सिंधुताई माझी माई या मालिकेतून त्या सिंधुताईंच्या आजीची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेमुळे प्रिया बेर्डे प्रथमच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
सिंधुताई माझी माई मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा प्रिया बेर्डे यांनी या मालिकेत काम करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्या कोणती भूमिका साकारणार हे निश्चित सांगितले नव्हते. प्रिया बेर्डे सिंधुताईंच्या भूमिकेत दिसणार असे विविध तर्क लावण्यात येऊ लागले. मात्र आता यावरचा पडदा हटला असून त्या आता सिंधुताईंच्या आजीच्या भूमिकेत झळकणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. प्रिया बेर्डे यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आता ही आजीची भूमिका त्या कशी निभावतात याची उत्सुकता त्यांच्या तमाम चाहत्यांना आहे. तूर्तास या नवीन मलिकेसाठी आणि नवीन भूमिकेसाठी प्रिया बेर्डे यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.