मुंबईत हक्काचं घर घेणं ही काही साधी गोष्ट राहिलेली नाही. मुंबईत घर घ्यायचं म्हटलं की इथे लाखो करोडो रुपये मोजावे लागतात म्हणून मग छोट्या पडद्यावरची कलाकार मंडळी कलाकार कोट्यातील म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेली असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय केळकरने पहाडी गोरेगाव आणि मागाठाणे मधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले होते. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप याने याआधी कोकण मंडळाच्या घरासाठी अर्ज केला होता. घराचा ताबा मिळण्यास वेळ होता त्यामुळे पृथ्वीकने मुंबईतही नशीब आजमावण्याकरिता मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न केला.
गोरेगाव आणि विक्रोळीतील घरासाठी पृथ्विकने अर्ज केले होते. त्यात आता पृथ्वीकचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार झालेले पाहायला मिळत आहे. मराठी सृष्टीत आजवर अनेक कलाकारांना म्हाडाची लॉटरी लागलेली आहे. हेमांगी कवी आणि भारत गणेशपुरे यांना म्हाडाची घरं मिळाली आहेत. ही घरं छोटी जरी असली तरी ती त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे सजवलेली पाहायला मिळतात. पृथ्वीक प्रताप शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानच्याच वाढदिवसाच्या दिवशी त्याला घराचा ताबा मिळाला आहे त्यामुळे पृथ्वीकचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या नवीन घराची बातमी त्याने शेअर करताच सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण कसं झालं हे सांगताना पृथ्वीक त्याचा प्रवास उलगडताना म्हणतो की, आजवर अनेक स्वप्न पाहिली, अनेक पूर्ण केली. अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा पण एक स्वप्न जे आज पर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं. आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहा च छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं. आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगणे झाल्यासारख वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरु राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त! गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढ दिवशी त्यामुळे माझी ‘मन्नत’ पुरी झाली अस म्हणायला हरकत नाही. हे घर मिळण्यासाठी अनेकांची निस्वार्थ मदत झाली, त्या प्रेत्यकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.