प्रशांत दामले म्हणजे मराठी सृष्टीतील हास्याचा एक खळखळत्या उत्साहाचा झरा असे म्हटले जाते. साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट, बहुरुपी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बहुतेक नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने १००० हून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रात काम न करता त्यांनी अनेक नवख्या कलाकारांना प्रशिक्षण देऊन घडवण्याचे काम हाती घेतले आहे. यातून त्यांनी बहुतेकांना नाटकातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रशांत दामले यांचा अभिनयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला तो काळ होता १९७८.
हौशी नाटक करता करता १९८३ साली त्यांना टूर टूर नाटकातून काम करण्याची नामी संधी मिळाली. त्याच वेळी बेस्टमध्ये त्यांना नोकरी लागली. मग पुढे महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, बहुरुपी, चित्रपट सुरू झाले या प्रवासात त्यांना बेस्टकडून खूप चांगले सहकार्य मिळाले. एवढेच नाही तर त्यांनी प्रशांत दामले यांना जवळजवळ ५ वर्षांची सुट्टीच मंजूर करून दिली. मात्र एकीकडे नाटकांची आवड आणि घरसंसार या द्विधामनस्थितीत असताना कोणतातरी एक निर्णय घ्यावा लागेल याची जाणीव त्यांना झाली. १९९२ मध्ये गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या पहिल्याच प्रयोग वेळी जाणवलं की आता आपण हेच काम करायचंय. पदरी दोन मुली असल्याने पत्नीशी विचारविनिमय केला आणि १०० टक्के नाटकच करायचं असा निर्णय मनाशी पक्का केला.
अभिनय कारकीर्दीच्या प्रवासात कुणाचा तरी भक्कम पाठिंबा असणे गरजेचे असते. प्रशांत दामले यांना देखील असाच भक्कम पाठिंबा मिळाला तो सुधीर भट यांच्याकडून. ‘माझ्या अभिनयाला पाठिंबा करणारा कोणी व्यक्ती असेल तर तो म्हणजे सुधीर भट. त्यांनी सातत्याने मला नाटकात घेतले. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो.’ असे ते दिलखुलासपणे व्यक्त होताना दिसतात. एका लग्नाची गोष्ट व मोरूची मावशी या नाटकात काम करण्याची संधी मिळाली असल्यानेच मी आज इतकी वर्षे या क्षेत्रात टिकून आहे, असे प्रशांत दामले म्हणतात. सारखं काहीतरी होतंय या नाटकातून प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या नाटकाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून प्रशांत दामले भारावून गेले आहेत. प्रशांत यांच्याबद्दलची एक खास गोष्ट बहुतेकांना अपरिचित आहे. प्रशांत दामले उत्तम गातात हे सर्वांनाच माहीत आहे, ते उत्तम खवय्ये देखील आहेत हेही सर्वांना ठाऊक आहे. मात्र गाण्याचे शब्द विसरण्याची त्यांना एक सवय आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून प्रशांत दामले गीत सादर करायचे परंतु ह्या शब्द विसरण्याच्या सवयीमुळे ते वेळप्रसंगी कशी बशी वेळ मारून न्यायचे. अर्थात यात त्यांचे सहकलाकार प्रशांत दामले यांना त्याची जाणीव करून द्यायचे. मात्र मी शब्द विसरलो याची जाणीव होताच ते दिलखुलास स्वतःवरच हसायचे.