एका रीलमुळे मालिकेत चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे ह्या गोष्टी आता मराठी सृष्टीला काही नवीन नाहीत. सोशल मीडियावर असे अनेक रिल्स बघायला मिळतात. गुरुदत्त यांच्या गाण्यावर रील बनवून मन उडू उडू झालं मालिका फेम प्राजक्ता परब हिने थेट बॉलिवूड चित्रपटातच स्थान मिळवलं आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतून मुक्ताची भूमिका साकारून प्राजक्ता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर प्राजक्ता पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होती. तिथे खेळाडूंची सर्व जबाबदारी तीच पाहत होती. हॉटेलमध्ये नोकरी करत असताना प्राजक्ताला अभिनयाचे वेध लागले.
अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिने घरच्यांकडून वेळ मागितला होता. प्राजक्ताने हळूहळू जाहिरात क्षेत्रात आपला जम बसवण्यास सुरुवात केली होती. अगदी कार्तिक आर्यनसोबत तिने एंगेज डिओची ऍड केली होती. सेन्टरफ्रेश, महाराष्ट्र शासनाची वेस्ट नो मोअर, वेकफील्ड डेसर्ट, जिओ मार्ट अशा जाहिरातीतून तिला झळकण्याची संधी मिळत गेली. पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असताना रजनीकांत, नाना पाटेकर या दिग्गज कलाकारांसोबत तिची चांगली ओळख झाली होती. तरी देखील स्वतःच्या बळावरच कला क्षेत्रात येण्याचे धाडस तिने दाखवले होते. व्यावसायिक जाहिरातीमुळे प्राजक्ताला प्रसिद्धी मिळत गेली. या व्यावसायिक जाहिरातीत काम करत असताना ललित २०५, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकांत तिला संधी मिळाली.
माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीजमध्ये प्राजक्ताला महत्वाची भूमिका मिळाली होती. मन उडू उडू झालं या मालिकेचे दिगदर्शन मंदार देवस्थळी करणार असल्याचे तिला कळले. मालिकेत काम करता यावं म्हणून तिने ऑडिशन दिली. त्यात तिला इंद्राच्या बहिणी भूमिका साकारायला मिळाली. मुक्ता ही भूमिका थोडीशी अल्लड असली तरी पुढे जाऊन ती इंद्रा आणि दिपूच्या नात्यातील दुवा ठरली. गुरुदत्त यांच्या गाण्यावरील रील तिने इंस्टावर अपलोड केला. प्राजक्ताचे एक्सप्रेशन पाहून श्रुती महाजन यांच्या टीमने तिला ऑडिशनसाठी बोलावले. चूप या बॉलिवूड चित्रपटातील दलकीरच्या आईची भूमिका तिला साकारण्याची संधी मिळाली. कधी बॉलिवूड चित्रपटात काम करता येईल अशी अपेक्षा न केलेल्या प्राजक्तसाठी ही मोठी पर्वणीच चालून आली.