सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या तुझं माझं सपान या मालिकेत प्रेक्षकांना दोन पैलवानांची प्रेम कहाणी पाहायला मिळत आहे. प्राजक्ता आणि वीरेंद्र हे दोन पैलवान सध्या एकमेकांच्या विरोधात वावरत आहेत. मात्र त्यांची केमिस्ट्री कशी जुळणार हे येत्या काही दिवसातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीने कायम वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. या मालिकांचे प्रेक्षकांनी स्वागतच केलेले पाहायला मिळते. तुझं माझं सपान या मालिकेतून प्राजक्ता आणि विरुची दमदार जोडी झळकत आहे. ही भूमिका अभिनेता संकेत निकम आणि प्राजक्ता चव्हाण हिने साकारलेली आहे.

संकेत निकम हा अभिनेता आहे मात्र त्याने काही हिंदी प्रोजेक्ट साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. कॉलेज मस्ती, इंद्रारी, जय शिवराय अशा प्रोजेक्टमधून तो अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर मालिकेची नायिका प्राजक्ता चव्हाण ही खऱ्या आयुष्यात सुद्धा पैलवानच आहे. बालपणापासूनच कुस्तीच्या आखाड्यात वावरणारी प्राजक्ता आता नायिका बनून मालिकेचा आखाडा गाजवणार आहे. प्राजक्ता बालपणापासूनच कुस्तीचे धडे गिरवते. त्यामुळे तीचे पालनपोषण एका मुलाप्रमाणेच झालेलं आहे. अगदी डोक्याला टक्कल करण्यापासून ते पॅन्ट शर्ट मध्येच ती कायम वावरली आहे. त्यामुळे मालिकेतला तिचा साडीतला लूक पाहून तिच्या आईवडिलांनी, ही तूच आहेस का? अशी प्रतिक्रिया दिली होती.

प्राजक्ता ही मूळची साताऱ्याची, तिने कुस्तीमध्ये आजवर राज्यस्तरीय पातळीवर उत्तम कामगिरी बजावलेली आहे. या मालिकेसाठी तिची निवड करण्यात आली त्यावेळी ती नायिका बनलीये यावर तिचा विश्वासच बसला नव्हता. या सर्व गोष्टी तिला स्वप्नवत वाटत होत्या. प्राजक्ताच्या भूमिकेसाठी तिला काही विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. कारण कुस्तीच्या आखाड्यात वावरलेल्या प्राजक्ताला अभिनय शिकावा लागत आहे. यासाठी तिने प्रशिक्षण देखील घेतलेले आहे. याशिवाय सहकलाकार आणि मालिकेच्या टीम कडून तिला चांगले सहकार्य सुद्धा मिळत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेचे डायरेक्टर सचिन गोस्वामी सर यांची हि निर्मिती आणि डायरेक्शन असलेली आणखी एक सीरिअल ठरणार आहे. या आगळ्यावेगळ्या भूमिकेसाठी प्राजक्ता चव्हाण आणि संकेत निकम यांना शुभेच्छा.