सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये असलेली ही महिला या रावजी बसा भाऊजी या गाण्यावर हातवारे करताना पाहायला मिळते. या वृद्ध महिलेचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे सांगितले जाते. मात्र ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर आहेत. हे समजल्यावर अनेकांनी त्यांच्या या परिस्थितीचा मागोवा घेतला. शांताबाई कोपरगावकर यांचे सध्याचे वय ७५ वर्षे आहे. कोपरगाव येथील बस स्थानकावर त्या गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्या कलावंत आहेत हे उघड झाले.

एकेकाळी आपल्या लावणी नृत्याने त्यांनी लालबाग परळ येथील हनुमान थिएटर गाजवले होते. त्यावेळी कोपगाव बसस्थानकावर काम करणाऱ्या कर्मचारी अत्तार भाईंशी त्यांची ओळख झाली होती. अत्तार भाईंनी शांताबाईंच्या नावाने तमाशा फड काढला. शांताबाईंना त्यांनी या फडाची मालकीण बनवले होते. महाराष्ट्रात जत्रा यात्रा मध्ये शांताबाईंनी अमेक कार्यक्रम सादर केले. बक्कळ पैसा कमावला. पुढे अत्तार भाईंनी त्यांचा तमशाफड विकायला काढला. यात शांताबाईंची मोठी फसवणूक करण्यात आली. या घटनेमुळे शांताबाईंचे मानसिक संतुलन ढासळले. काळजी घेणारी जवळची माणसं कोणीच नव्हती. त्यामुळे शांताबाई बसस्थानकावर भीक मागू लागल्या. पन्नास साठ लोकांचे पोट भरणाऱ्या शांताबाई एकाएकी रस्त्यावर आल्या.

कोपगावचे बसस्थानक हेच त्यांचे घर बनले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक कार्यकर्त्यांनी शांताबाई यांना हुडकून काढले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शांताबाई कोपरगावकर यांना शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी आणि कलावंतांची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. वृद्धापकाळात लोककलावंतांची हेळसांड होते याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र शांताबाई यांच्यावर ही परिस्थिती ओढावण्याचे कारण आहे अत्तार भाई. अत्तार भाईने त्यांची फसवणूक केली असल्यानेच त्यांची अशी दुरावस्था झाली अशी चर्चा पाहायला मिळत आहे. शांताबाई यांची ही परिस्थिती पाहून अनेजण आता हळहळ व्यक्त करत आहेत. सुरेखा पुणेकर यांनी देखील शांताबाईंना योग्य ती मदत मिळवून द्यावी असे म्हटले आहे.