अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने काही दिवसांपूर्वीच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेतील नवख्या कलाकारांकडून मिळत असलेली वागणूक आणि भूमिकेला पुरेसा वाव मिळत नसल्याने अपूर्वाने यापुढे शेवंताची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. अपूर्वाने रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली होती. मात्र मालिकेचा तिसरा सिजन तिच्यासाठी निराशाजनक ठरला.
आपल्या भूमिकेला पुरेसा वाव मिळत नसल्याने तसेच नवख्या कलाकारांनी तिच्या वाढलेल्या वजनाची उडविलेली खिल्ली सहन न झाल्याने, तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडताच शेवंताची भूमिका आता अभिनेत्री “कृतिका तुळसकर” साकारत आहे. कृतिका तुळसकर आपल्या वयाच्या १० व्या वर्षापासूनच नाटकात काम करत होती. अभिनयाची आवड असल्याने कृतिकाने अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी वडिलांनी तिला अगोदर आपले शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. युके मधून मास्टर्सची डिग्री मिळवल्यानंतर तिने ह्यातच आपले करिअर करावे अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा होती. मात्र जेव्हा आपण अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडणार असल्याचे कळवल्यानंतर कृतिकाला घरच्यांकडून विरोध व्हायला लागला. घरातून होणारा विरोध झुगारून कृतिका मुंबईच्या दिशेला वळली. मात्र कुठलीही ओळख नसल्याने तिने तीन रात्र रेल्वे स्टेशनवर झोपून काढली. वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देऊन नाटक, हिंदी, मराठी चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. लग्न बंबाळ हे नाटक तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं.
इथूनच बाय गो बाय या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली. उलटसुलट, विजेता, वेडिंगचा शिनेमा, बबन अशा नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. रंगभूमी आणि मोठा पडदा गाजवत असतानाच आता तिची पाऊले छोट्या पडद्याकडे वळली आहेत. रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत अपूर्वा नेमळेकर साकारत असलेली शेवंताची भूमिका कृतिकाच्या वाट्याला आली आहे. अपूर्वाने रंगवलेली शेवंता प्रेक्षकांची लोकप्रिय ठरली होती त्यामुळे कृतिकासाठी ही भूमिका आव्हानात्मक असणार आहे. मालिकेत ती काही दिवसांपूर्वीच सक्रिय झाली आहे. त्यामुळे अपूर्वाच्या जागी कृतिकाला पाहून प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. मात्र प्रेक्षकांची निराशा न होऊ देता कृतिका तिच्या अभिनयाने ही भूमिका सुरेख निभावताना पाहायला मिळत आहे. शेवंताच्या भूमिकेसाठी अभिनेत्री कृतिका तुळसकर हिला मनःपूर्वक शुभेच्छा.