रितेश आणि जेनेलियाच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लागलं आहे. वेड चित्रपटाची यशस्वी घोडदौड तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सुद्धा बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कुत्ते चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ दाखवत वेड ला पसंती दर्शवली आहे. १५ व्या दिवशी सुद्धा वेड चित्रपटाने १ कोटी ३५ लाखांची कमाई बॉक्सऑफिसवर केली आहे. दोन आठवड्यात चित्रपटाने एकूण ४२ कोटी २० लाखांचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. ही लाडकी जोडी नुकतीच कपिल शर्माच्या शोमध्ये गेली होती त्यावेळी या दोघांनी आपल्या खाजगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी मन मोकळेपणाने शेअर केल्या.
रितेश आणि जेनेलियाची रिअल लाईफ केमिस्ट्री पाहून अनेकांनी कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. लग्न झाल्यानंतर जेनेलियाने अभिनयातून ब्रेक घेतला होता. अर्थात मुलांच्या पालनपोषणाची आणि एक व्यक्ती म्हणून घडवण्याची जबाबदारी तिने समर्थपणे सांभाळली. जेनेलियाच्या करिअर बाबत रितेश म्हणतो की, जेनेलियाने माझ्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. तिने अनेक भाषांमधून काम केलं आहे, पण मला अभिमान आहे की ती कमाईच्या बाबतीत माझ्यापेक्षा वरचढ ठरली आहे. असाच एक आठवणीतला किस्सा सांगताना रितेश जेनेलियाचे कौतुक करताना म्हणतो की, आम्ही सगळेजण क्रिकेटचा सेलिब्रिटी लीग खेळत होतो. या लीगचे तीन चार सिजन झाले, याची खासियत अशी होती की तिथे तमिळ, तेलगू, कर्नाटक, मराठी, बॉलिवूड अशा वेगवेगळ्या टीम खेळत होत्या.
याच निमित्ताने एकदा बंगलोरला असताना लिफ्टमधून मी जात होतो, लिफ्टमध्ये साऊथच्या टीममधील आणखी दोघे जण होते. मला पाहताच ‘जेनेलियाज हजबंड’ अशी ओळख मला मिळाली, त्यावेळी माझा इगो हर्ट झाला. त्यांना उत्तर देताना म्हणालो की, इथे मी जेनेलियाचा नवरा म्हणून ओळखला जातो. मात्र महाराष्ट्रात ती रितेशची बायको म्हणून ओळखली जाते. तेव्हा ते दोघे हसून म्हणाले रितेशची बायको म्हणून एकाच राज्यात ओळखलं जात असेल. पण जेनेलियाचा नवरा म्हणून तू केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यात ओळखला जातो. हे ऐकल्यावर मात्र रितेशला त्या लिफ्टमधून कधी बाहेर पडेल असे झालं होतं. ही मजेशीर बाब अधोरेखित करताना रितेशला जेनेलियाने मिळवलेल्या यशाचा गर्व वाटतो हेही तो सांगायला विसरत नाही.