झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेतील यश, नेहा, समीर यांच्या इतकीच लाडक्या परीची भूमिका देखील प्रेक्षकांना विशेष भावली आहे. मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ आता तिच्या सहजसुंदर आणि निरागस अभिनयाने एक्सप्रेशन क्वीन म्हणूनही ओळखली जात आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत येण्याअगोदर मायरा सोशल मीडियावर हिट ठरली होती. इथूनच तिला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली होती. मायराच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लवकरच मायरा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कोलीवूड प्रॉडक्शन प्रस्तुत ‘आई’ हे नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आई या गीताचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात लाडकी परी म्हणजेच मायरा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शाळेच्या गणवेशात असलेली मायरा मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. प्रवीण कोळी यांचे संगीत असलेली अनेक गीतं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेलं गोव्याच्या किनाऱ्यावर, या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. सण आयलाय गो, आमचा मोरया रे, इश्काची नौका, चिंतामणी माझा, माझा बाप्पा, गोल्डीची हळद, माझा पिल्लू अशी प्रवीण कोळी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुपरहिट झाली आहेत.
आई विना मला करमत नाही, असे म्हणत मायरा आता आई या गाण्यातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे या गाण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो ह्या लोकप्रिय गाण्याची गायिका दिया वाडकर हिने आई हे गाणं गायलं असून मायराला दियाच्या गाण्यात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. दिया वाडकर या एका गाण्यामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळवून गेली होती. त्यामुळे मायरा आणि दिया या चिमुकल्या कलाकारांसाठी आई हे नवीन गाणं खूप खास ठरणार आहे. या नवीन भूमिकेसाठी आणि गायिकेसाठी, दिया वाडकर आणि मायरा वायकुळ या दोघींचे खूप खूप अभिनंदन.