महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या चित्रपटाच्या माध्यमातून आपले नशीब आजमावत आहे. सहाय्यक, खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा ओंकार गेल्या काही दिवसांपासून आता मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. सरला एक कोटी हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर ओंकारकडे चित्रपटांची रांगच लागलेली पाहायला मिळत आहे. लवकरच ओंकार भोजने एका आगळ्या वेगळ्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या या नव्या चित्रपटात त्याच्यासोबत दुसरा कुठलाच कलाकार नसणार आहे.
याबद्दल स्वतः चित्रपटाचे निर्माते महेश मांजरेकर यांनी खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांची एक लिस्टच प्रेक्षकांसमोर मांडली आहे. सुबोध भावे उपेंद्र लिमये आणि गौरी सोबत ते एक लव्हस्टोरी असणारा चित्रपट करत आहेत. मृगतृष्णा नावाचा श्रेयस तळपदे सोबत त्यांचा आणखी एक चित्रपट बनून तयार झाला आहे. येत्या जानेवारी ते मे या पाच महिन्यातच महेश मांजरेकर यांचे तब्बल ४ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांची तारीख पण लवकरच जाहीर होईल असे त्यांनी म्हटले आहे. जुनं फर्निचर या नावाचा आणखी एक चित्रपट त्यांनी बनवला आहे. त्यात त्यांनी स्वतःच चित्रपटातील बारकावे लिहिले आहेत.
हा त्यांच्या मनाच्या जवळचा चित्रपट आहे. त्यामुळे या भूमिकेला कोणता दुसरा अभिनेता न्याय देईल की नाही याबाबत त्यांना शंका होती. म्हणून त्यांनीच स्वतः या चित्रपटात काम केले आहे. कुठल्या कलाकाराने ती भूमिका केली असती तरी मी त्यात समाधानी झालो नसतो. कारण मी लिहिताना ती भूमिका जगत होतो अनुभवत होतो. कुठल्याही अभिनेत्याची ती चूक नाही पण मलाच ती भूमिका करावीशी वाटली म्हणून मी ती केली. असे त्यांनी या चित्रपटाबाबत म्हटले आहे. जानेवारीमध्येच या चित्रपटाने नवीन वर्षाची सुरुवात होईल अशी हींट त्यांनी यावेळी दिली आहे. ओंकार भोजनेच्या चित्रपटाबद्दल ते एक मोठा खुलासा करतात की, तो एकटाच या चित्रपटात आहे.
अख्ख्या चित्रपटात एकच कॅरॅक्टर आहे. १ तास ४० मिनिटं हे कॅरॅक्टर बोलतो आणि तुमचं डोकं फिरवतं. यात कोणतीही नायिका नसणार, तो एकटाच या चित्रपटात १ तास ४० मिनिटं बोलत राहणार आहे. त्याचा एक एक शॉट १० ते १५ मिनिटांचा असणार आहे. कट करायला कुठे जागाच नव्हती, त्यामुळे समोर कॅमेरा आणि तो अशा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण देखील झालं आहे. या चित्रपटाचं नाव त्यांनी राजामौली ठेवलं आहे. फेब्रुवारी नाहीतर मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. हा चित्रपट एक आगळा वेगळा प्रयोग म्हणून करण्याचे त्यांनी ठरवले होते. ओंकार भोजने यात मुख्य भूमिका साकारणार हे अगोदरच ठरवण्यात आले होते.
महेश मांजरेकर यांनी हा खुलासा केल्यानंतर अनेकजण या विचारात गुंगले आहेत. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असल्याने या चित्रपटात ओंकार भोजने नेमकं काय करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ओंकार हा तगडा अभिनेता आहे तो या चित्रपटाला योग्य न्याय देईल असा विश्वास असल्याने त्याचे चाहते देखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.