महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ओंकार भोजने हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलं होतं. आपल्या विनोदी अभिनयाने ओंकारने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. ओंकार हास्यजत्रेत असताना चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. त्यामुळे कधी कधी तो शोमध्ये दिसत नव्हता. मात्र ओंकारला झी मराठी वाहिनीने संधी देऊ केली तेव्हा तो फु बाई फु च्या नवीन पर्वात पाहायला मिळाला. तेव्हापासून ओंकारने हास्यजत्रा सोडली अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र जिथे त्याला संधी मिळेल तिथे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकावीत असा सल्ला चाहत्यांकडून मिळू लागला. काही दिवसातच प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने फु बाई फुचा शो बंद करावा लागला.
फु बाई फु मुळे ओंकार आणि हास्यजत्राच्या कलाकारांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली होती. पण त्यानंतर काही दिवसातच ओंकारचा प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ओंकारकडे हिंदी चित्रपट देखील आहे, त्यामुळे त्याचं शेड्युल व्यस्त असल्याचे बोलले जाते. अशातच आता ओंकारला एक नामी संधी मिळाली आहे. चक्क महेश मांजरेकर यांनी त्याला ही संधी देऊ केली आहे. लवकरच ओंकार एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करून गेलो गाव हे नाटक नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाच्या निर्मितीची धुरा महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे यांनी सांभाळली आहे. तर चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम ओंकारला साथ देणार आहे.
करून गेलो गाव हे व्यावसायिक नाटक मालवणी भाषेत आहे. मालवणी भाषेवर प्रेक्षकांचं अतूट प्रेम आहे. ओंकारने कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या होत्या. त्यामुळे रंगभूमीशी त्याचं नातं देखील गेल्या अनेक वर्षांचं आहे. जोडीला भाऊ कदम यांची साथ त्याला मिळणार असल्याने नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. करून गेलो गाव नाटकाचे लेखन, दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी राजेश देशपांडे यांनी बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत चंडप्पाचे पात्र साकारले होते. मूळचे रत्नागिरीचे असलेले राजेश देशपांडे यांनी विनोदी कलाकारांना घेऊन हे नाटक दिग्दर्शित करायचे ठरवले. त्यामुळे आता ही दोन विनोदवीरांची जोडी रंगभूमीवर पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहेत.