११ ऑगस्ट रोजी बॉलिवूडचे दोन बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाले. गदर आणि ओएमजीच्या अभूतपूर्व यशानंतर या दोन्ही चित्रपटांचे सिक्वल एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान गदर २ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच बाजूला अक्षय कुमारच्या OMG २ लाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काल पहिल्याच दिवशी गदर २ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल ४० कोटींची कमाई केली. तर ओएमजीने ९ कोटी ५० लाखांची कमाई करत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. अर्थात गदर२ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ओएमजीला प्रेक्षकांनी चार स्टार दिले आहेत.
ओएमजीचे कथानक आवडणारा एक जाणता प्रेक्षकवर्ग आहे. या चित्रपटात तुम्हाला लैगिंक आरोग्यावर भाष्य करणारे कथानक पाहायला मिळत आहेत. मुलांमध्ये लैगिंक न्यूनगंड असतो किंवा या गोष्टींवर ते मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. अशातच ते चुकीचे पाऊल उचलतात आणि त्याला तोंड देताना वडिलांची जी धावपळ उडते त्यावर ओएमजीचे कथानक रंगलेले तुम्हाला पाहायला मिळेल. चित्रपटाचा मुख्य कलाकार अक्षय कुमार असला तरी पंकज त्रिपाठी या चित्रपटात भाव खाऊन जातात. यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांनी हा संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे. अरुण गोविल, पवन मल्होत्रा, गोविंद नामदेव यांचीही या चित्रपटाला चांगली साथ मिळाली आहे. महत्वाचं म्हणजे पंकज त्रिपाठी यांचा मुलगा लैंगिक आरोग्याचा बळी पडतो, तो स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो.
मात्र मांत्रिक तांत्रिक आणि नंतर मेडिकलमधील औषधांमुळे तो भयंकर आजारी पडतो. आपल्या मुलाला यातून बाहेर पडण्यासाठी पंकज त्रिपाठी आवाज उठवतात. शिवजीच्या भूमिकेतील अक्षय कुमारची त्यांना मदत मिळते. असे हे कथानक आजच्या तरुण पिढीला एक संदेश देण्याचे काम करतो. लैंगिक आरोग्यावर उघडपणे बोलले जात नाही हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न अमित राय यांनी केला आहे. त्यामुळे आपल्या शालेय मुलांना हा चित्रपट दाखवला जावा अशी मागणी केली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना लैगिंक शिक्षण दिले जाते मात्र मनमोकळेपणाने त्यावर बोलायला मुलं घाबरतात. अशातच त्यावर उपाय म्हणून चुकीचा उपचार केल्याने काय होते हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून ओएमजी २ ला चांगली पसंती दिली जात आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी किशोरवयीन मुलांची गर्दी वाढायला हवी अस एकमत प्रेक्षक देत आहेत.