आज नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येने कला सृष्टीत एकच खळबळ उडाली. नितीन देसाई यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्या अगोदर बोलायला हवं होतं अशी भावना आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी, किशोरी शहाणे, महेश मांजरेकर या तमाम मराठी कलाकारांनी बोलून दाखवली. नितीन देसाई यांच्या नावाने असलेल्या कर्जत मधील एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड होऊन न शकल्याने नितीन देसाई यांच्या मालमत्तेवर जप्तीची टांगती तलवार होती. दरम्यान एनडी स्टुडिओत गेल्या काही वर्षांपासून कुठलेच चित्रीकरण होत नसल्याने व्याजाची रक्कम वाढून २४९ कोटी इतकी झाली होती.
कर्ज फेडता येणार नाही या विचारानेच नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असे बोलले जात आहे. नितीन देसाई हे काल दिल्लीहून कर्जतला आले होते. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी रात्र घालवली. आज पहाटे ४ च्या सुमारास त्यांनी हा टोकाचा निर्णय घेत आपले आयुष्य संपवले. सीएफएम वित्तीय संस्थेकडून त्यांनी २०१६ आणि २०१८ साली हे कर्ज घेतले होते त्यासाठी त्यांनी एनडी स्टुडिओ गहाण ठेवले होते. आज रायगड जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी जितेंद्र पाटील यांनी खळबळजनक खुलासे केलेले पाहायला मिळाले. नितीन देसाई हे अनेकदा जितेंद्र पाटील यांच्याशी या कर्जाबाबत बोलले होते. महिन्यातून एकदा तरी या दोघांची भेट होत असे.
त्यावेळी नितीन देसाई आपल्या मनातली खंत मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याजवळ व्यक्त केली होती. एनडी स्टुडिओत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काही प्रोजेक्ट येत होते पण स्टुडिओला काम मिळू नये म्हणून काही लोकांचे प्रयत्न असायचे. याचमुळे नितीन चंद्रकांत देसाई हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली वावरत होते. कला क्षेत्रातील काही नामांकित व्यक्तींकडून एनडी स्टुडिओला शूटिंग केल्या जात नव्हत्या असे जितेंद्र पाटील यांनी या खुलास्यात म्हटले आहे. ही घटना घडणं अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. पण या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे असे मत जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान एनडी स्टुडिओला बॉलिवूड सृष्टीने बायकॉट केलं होतं अशी चर्चा पाहायला मिळत आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या नितीन देसाई यांना एवढी मोठी कर्जाची रक्कम कशी फेडावी याचाच प्रश्न सतत सतावत होता. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी नितीन देसाई यांनी एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवली होती. या क्लिपमध्ये त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावं आहेत असे म्हटले जात आहे. पोलिसांनी ही क्लिप ताब्यात घेतली असून यावर लवकरच काय तो खुलासा केला जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.